मुंबई : २०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. भारतीय टीमने या वर्ल्ड कपमध्ये तयारीच चुकीच्या पद्धतीने केली होती, अशी टीका युवराज सिंगने केली आहे. युवराज सिंगने २०१९ वर्ल्ड कप सुरु झाल्यानंतर १० दिवसांमध्येच निवृत्तीची घोषणा केली होती. युवराजनेच भारताला २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकून दिला होता. २०११ वर्ल्ड कपमध्ये युवराजला मॅन ऑफ द सीरिज देऊनही गौरवण्यात आलं होतं. यानंतर २०१५ वर्ल्ड कपमध्ये युवराजची निवड झाली नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमजोर मधली फळी भारताच्या अपयशाचं कारण ठरली, असं मत युवराजने मांडलं आहे. मधल्या फळीबाबत टीमकडे कोणतीही ठोस रणनिती नव्हती. ऋषभ पंत आणि विजय शंकर यांच्यासारख्या अनुभव नसणाऱ्या खेळाडूंना मधल्या फळीत खेळवण्याच्या रणनितीवरही युवराजने प्रश्न उपस्थित केले आहेत.


'मला नाही वाटत ते मला पर्याय शोधत होते. अंबाती रायुडूसोबत जे काही झालं त्यामुळे मी निराश झालो. तो एका वर्षापेक्षा जास्त काळ चौथ्या क्रमांकावर खेळत होता. न्यूझीलंडमध्ये झालेल्या शेवटच्या मॅचमध्येही त्याने ९० रन केले होते आणि त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं होतं,' असं वक्तव्य युवराजने केलं.


'जेव्हा आम्ही २००३ वर्ल्ड कपमध्ये खेळलो तेव्हाची ती टीम सगळ्या ठिकाणी खेळली. आमचा अनुभव शानदार होता. मी आणि मोहम्मद कैफने ३५-४० मॅच खेळल्या होत्या. आमची वरची फळी आणि मधली फळीही अनुभवी होती,' असं युवराजने सांगितलं.


२०१५ वर्ल्ड कपसाठी भारताने संभाव्य खेळाडूंची यादी घोषित केली. या यादीत युवराजचं नाव नसल्यामुळे वाद झाले होते. युवराजचे वडील योगराज सिंग यांनी धोनीवर आरोप केले होते. धोनीमुळेच युवराजची निवड झाली नसल्याचं तेव्हा योगराज सिंग म्हणाले होते. युवराजने मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.