Yuzvendra Chahal Reaction: येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून त्यामध्ये लेग स्पिनर युझवेंद्र चहलचा समावेश करण्यात आलेला नाही. नुकंतच अक्षर पटेलने दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून माघार घेतली असून त्याच्या जागी आर. अश्विनचा समावेश करण्यात आला. मात्र यावेळीही युझवेंद्र चहलला संधी दिली गेली नाही. अशातच वर्ल्डकपच्या टीममधून ड्रॉप झाल्यानंतर पहिल्यांदाच युझवेंद्र चहलने मौन सोडलं आहे. 


गेल्या टी-20 वर्ल्डकपमधूनही युझवेंद्र होता बाहेर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्डकपच्या टीममध्ये युझवेंद्र चहलला स्थान मिळवता आलं नाही. इतकंच नाही तर 2021 च्या टी-20 वर्ल्डकपमध्येही त्याला संधी देण्यात आली नव्हती. 2022 मध्ये त्याला टीममध्ये संधी देण्यात आली मात्र तो प्लेईंग-11 चा भाग होऊ शकला नाही. आयसीसीची ही सलग तिसरी स्पर्धा आहे ज्यात चहल खेळू शकणार नाही. 


काय म्हणाला य़ुझवेंद्र चहल?


विस्डेनशी बोलताना युझवेंद्र चहल म्हणाला, 'मला आता याची सवय झाली आहे. हा जीवनाचा एक भाग बनलाय. मी समजू शकतो की, हा वर्ल्डकप आहे आणि केवळ 15 खेळाडू टीमचा भाग असू शकतात. तुम्ही 17-18 खेळाडू घेऊ शकत नाही. याचं मला ही वाईट वाटतंय पण आता माझं ध्येय पुढे जाणं आहे. 


सलग 3 वर्ल्डकप झाले असून मला आता याची सवय झालीये. मला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळायचं असल्याने मी केंटमध्ये आलो आहे. मला भारतासाठी टेस्ट क्रिकेट खेळायचंय. हा माझ्यासाठी चांगला अनुभव आहे, असंही चहलने सांगितलंय. 


टीममध्ये एकूण 3 स्पिनर्सचा समावेश


भारताने आपल्या वर्ल्डकपच्या टीममध्ये 3 स्पिनर्सचा समावेश केला आहे. यामध्ये रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचा आधीच समावेश होता. त्यांच्यासोबत अक्षर पटेलचा समावेश होता. मात्र दुखापतीमुळे अखेरच्या क्षणी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा टीममध्ये समावेश करण्यात आला. 


वर्ल्डकपसाठी कशी आहे टीम इंडिया?


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.