टीममधून ड्रॉपआऊट केल्यानंतर युजवेंद्र चहल झाला भावनिक, शेअर केले हसरे दु:ख!
Yuzvendra Chahal: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात निवड न झाल्याने चहलने सोशल मीडियावर त्याच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली.
Yuzvendra Chahal Expressed Sorrow: वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून हार पत्करल्यानंतर भारतीय संघ अजूनही त्या दु:खातून सावरु शकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ड्रेसिंग रुममध्ये जाऊन टिमचे सांत्वन केले. असे असले तरी आता दु:ख व्यक्त करण्यापेक्षा पुढच्या सिरीजमधून पराभवाचा बदला घेण्याचा निश्चय टीम इंडियाने केलाय. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 5 सामन्यांच्या टी-20 सिरिजसाठी सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर सूर्यकुमार यादवकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.
टीम इंडियाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलला या सिलेक्शनमध्ये धक्का मिळाला आहे. भारतीय निवडकर्त्यांनी चहलचा समावेश सिरिजसाठी न केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता T-20 मालिका संघातून वगळल्यानंतर चहलची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भारतीय फिरकीपटूने चहलने एक्स वर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
युझवेंद्र चहलचे ट्विट
वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमधील पराभवानंतर आता टीम इंडिया आपल्या पुढील मिशन ऑस्ट्रेलियासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत लेगस्पिनर युझवेंद्र चहलला बाजुला करण्यात आले आहे. 5 सामन्यांच्या T20 मालिकेत चहल खेळताना दिसणार नाही. या संघात निवड न झाल्याने चहलने सोशल मीडियावर त्याच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली.
त्याने X (पूर्वीचे ट्विटर) वर स्मायली इमोजी पोस्ट केले आहे. तसं पाहायला गेलं तर त्याने स्मायली टाकला आहे. पण त्याच्या हसण्यातून त्याची वेदना स्पष्टपणे दिसत आहे. चहलला सततच्या वगळण्यात येत असल्यामुळे त्याचे चाहते संघ निवडीवर प्रश्न उपस्थित करत असून जोरदार ट्रोल करत आहेत. वर्ल्ड कप 2023 मध्ये निवड न झाल्याने चहल सय्यद मुश्ताक अली टी-20 खेळत होता. यामध्ये चहलने 7 सामन्यात 11 विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रशीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार. श्रेयस अय्यर शेवटच्या 2 सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून भारतीय संघात सामील होणार आहे.