श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकून झिम्बाब्वेनं इतिहास रचला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज झिम्बाब्वेनं ३-२नं जिंकली आहे.
कोलंबो : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज झिम्बाब्वेनं ३-२नं जिंकली आहे. पाचव्या वनडेमध्ये सिकंदर रझाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे झिम्बाब्वेचा तीन विकेटनं विजय झाला आहे.
आयसीसीच्या वनडे रॅकिंगमध्ये ११व्या क्रमांकावर असलेल्या झिम्बाब्वेचा हा आठ वर्षांनंतर देशाबाहेरचा पहिला मालिका विजय आहे. याचबरोबर श्रीलंकेमधला झिम्बाब्वेचा हा पहिला मालिका विजय आहे.
या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. ऑफ स्पिनर सिकंदर रझानं घेतलेल्या तीन विकेटमुळे श्रीलंकेला ५० ओव्हरमध्ये २०३/८ रन्स बनवता आल्या. यानंतर कठीण परिस्थितीमध्ये बॅटिंगला आल्यानंतर रझानं नाबाद २७ रन्स बनवून झिम्बाब्वेला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
झिम्बाब्वेचा ओपनर हॅमिल्टन मसकादझानं ७३ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेनं चांगली सुरुवात केली होती पण १३७/१ वरून त्यांची अवस्था १७५/७ अशी झाली होती. अखेर सिकंदर रझा आणि कॅप्टन ग्रॅम क्रिमरच्या संयमी खेळीमुळे झिम्बाब्वेनं विजय खेचून आणला.