नवी दिल्ली: सरकारी योजनेच्या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केल्यास १.५० लाखांची सूट मिळणार आहे. प्रदुषण रोखण्यासाठी तसेच इंधनाचा वापर कमी व्हावा, यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. ज्या प्रमाणात इंधनाचा वापर केला जात आहे. भविष्यात इंधनाची कमतरता भासू नये, यासाठी अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्माण करण्याकडे भर देत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात वाढ व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.


महिंद्रा, मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करतात. या गाड्यांची किंमत १५ लाखांच्या जवळपास आहे. योजने अंतर्गत इलेक्ट्रिक गाडी खरेदी केल्यावर ग्राहकांना १.५० लाखांचा फायदा मिळणार आहे. मोदी सरकारने फेम-२ (फास्ट अडॉप्शन अॅन्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हीकल) या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गाडीच्या खरेदीवर अनेक सूट देण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ २०२२ पर्यंत घेता येणार आहे. फेम-२ अंतर्गत पुढील तीन वर्षात १० लाख टूव्हीलर, ५ लाख थ्रीव्हीलर, ३५ हजार फोरव्हीलर आणि ७०९० मोठ्या वाहनांवर सब्सिडीचा फायदा मिळणार. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नियमानुसार, टूव्हीलर गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना २० हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी सूट देतील. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.