द युरोपयिन युनियनच्या दंडाविरोधात गुगलची दंड थोपटण्याची तयारी
गुगलला मोठा धक्का
मुंबई : गुगल या कंपनीला द युरोपयिन युनियननं ३२ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रतिस्पर्धी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या गुगुल कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. तीन वर्षांच्या चौकशीनंतर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ईयु कॉम्पिटीशनच्या आयुक्त मार्गेरेट वेस्टगर यांनी दिली आहे. गुगलनं आपल्या ब्राऊझर आणि सर्च इंजिनचा बाजारात आपल्या विस्तारीकरणासाठी अँड्रॉईडच्या वर्चस्वचा दुरुपयोग केल्याचं चौकशीत समोर आलं आहे.
'गुगलने 90 दिवसांच्या आत अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचा वापर थांबवणं गरजेचं आहे. तसं नाही केल्यास गुगलला नफ्यातील ५ टक्के भाग दंडापोटी दररोज भरावा लागेल', असा इशारा वेस्टेजर यांनी गुगलला दिला आहे. गुगलला मात्र हा दंड मान्य नाही. गुगलनं या दंडाविरोधात जाण्याची तयारी केली आहे. अँड्रॉइड ही सिस्टम लोकांना अधिकाधिक पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी बनवण्यात आली असल्याचं गुगलचे प्रवक्ते अल वर्नी यांनी म्हटलं आहे.
याआधी देखील युरोपियन युनियननं गुगलवर २.४ अब्ज युरोंचा दंड ठोठावला होता. युरोपियन युनियनचे आयुक्त वेस्टेजर यांनी दंड ठोठवण्याची घोषणा करण्याआधी गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांना फोनद्वारे कळवलं होतं. गुगल अनेक फोन कंपन्यांना गुगल क्रोम ब्राऊजर इन्स्टॉल करण्यासाठी भाग पाडत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.