फेसबुकवर दररोज होतोय ८००० जणांचा मृत्यू
आपण या जगाचा निरोप घेतल्यानंतर या डिजिटल खात्यांचं काय होणार?
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या 'फेसबुक'वर दररोज ८००० पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू होतोय. या शतकाच्या शेवटपर्यंत फेसबुक हे जगातील सर्वात मोठी व्हर्च्युअल दफनभूमी ठरेल... कारण या प्लॅटफॉर्मवर जिवंत व्यक्तींपेक्षा मृत व्यक्तींच्याच प्रोफाईल मोठ्या प्रमाणावर दिसतील. फेसबुक हे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैंकी एक प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील करोडो युझर्स ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाटसअप, स्नॅपचॅट, रेडिट आणि इतर सोशल मीडिया ऍप्सचा वापर करतात.
जगभरात एकट्या 'फेसबुक' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे जवळपास दोन अब्ज युझर्स आहेत. तर व्हॉटसअपकडे १.५ अब्ज, इन्स्टाग्राम १ अब्ज आणि ट्विटरकडे ३३.६ करोड युझर्स आहेत. यातील करोडो युझर्स केवळ भारतात आहेत.
सध्या डिजिटल युझर्सचा जास्तीत जास्त वेळ या सोशल मीडियावर जात असला तरी आपण या जगाचा निरोप घेतल्यानंतर या डिजिटल खात्यांचं काय होणार? हा प्रश्न अनेकांना सतावतो.
देशातील डिजीटल तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा ईमेल किंवा सोशल मीडिया अकाऊंट ही एक प्रकारे स्थानांतरणीय संपत्तीच आहे... त्यामुळे तिचा ताबा मृत व्यक्तीच्या वारसांना मिळायला हवा. त्यासाठी वारसांनी रितसर परवानगी घेऊ शकतात.
'मृत्यूपत्रा'प्रमाणेच फेसबुक आपल्या युझर्सकडून यासाठी अगोदरच परवानगी घेऊ शकतं. त्याआधारे युझरच्या मृत्यूनंतर त्याचं अकाऊंट हॅन्डल करण्याची परवानगी त्याच्या कौटुंबिक सदस्य किंवा मित्रांकडे सोपवली जाऊ शकते.
एका विकल्पाद्वारे तुम्ही मृत्यूनंतर आपलं अकाऊंट डिलीट करण्याचे आदेशही फेसबुकला देऊ शकता.
(इनपूट - आयएएनएस)