`एअरटेल`च्या जाहिरातीत मुलीनं मागितला बॉडीगार्ड, भडकला आकाश चोपडा!
जाहिरात क्षेत्रातील भंपकगिरी अनेकदा संवेदनशील प्रेक्षकांना खटकते... अशीच एक भंपक जाहिरात माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोपडा यालाही खटकलीय... आणि त्यानं यावर सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीकाही केलीय.
मुंबई : जाहिरात क्षेत्रातील भंपकगिरी अनेकदा संवेदनशील प्रेक्षकांना खटकते... अशीच एक भंपक जाहिरात माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर आकाश चोपडा यालाही खटकलीय... आणि त्यानं यावर सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीकाही केलीय.
जाहिरात क्षेत्राचे निगरानीकर्ता भारतीय जाहिरात मानक परिषदेनं (ASCI) भंपक जाहिरातींविरोधात मिळालेल्या तक्रारींपैकी २१४ तक्रारी योग्य असल्याचं मान्य केलंय. यामध्ये भारती एअरटेल, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, स्नॅपडील आणि एशिअन पेन्ट्स यांसारख्या कंपन्यांच्या जाहिरातींचाही समावेश आहे.
सीसीसीनं दूरसंचार कंपनी भारती एअरटेलच्या तीन जाहिराती भ्रामक असल्याचं म्हटलंय. त्यानंतर आकाश चोपडाही भडकलाय. आकाशनं या जाहिरातीत एका चिमुकलीच्या तोंडी दिलेल्या संवादांवर नाराजी व्यक्त केलीय. 'स्वत:ला वाईट नजरांपासून वाचवण्यासाठी एक लहान मुलगी स्मार्टफोनकडे एक बॉडीगार्ड मागतेय... जाहिरातींबद्दल किंवा भारताबद्दल हे आपल्याला काय सांगतंय?' असा प्रश्न आकाशनं विचारलाय. शिवाय 'ही जाहिरात अजिबात क्यूट नाही' असंही आकाशनं एअरटेलला सुनावलंय.
उल्लेखनीय म्हणजे, याआधी रिलायन्स जिओनंही भारती एअरटेलवर ग्राहकांना भुलवण्यासाठी दरासंबंधी भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय.