व्हॉट्सअॅपला टक्कर देणार रामदेव बाबांचं स्वदेशी `किंभो`
योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीनं बीएसएनएलसोबत भागिदारी करून पंतजली-बीएसएनएल स्वदेशी समृद्धी सीम कार्ड आणलं.
मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीनं बीएसएनएलसोबत भागिदारी करून पंतजली-बीएसएनएल स्वदेशी समृद्धी सीम कार्ड आणलं. हे सीम कार्ड सध्या पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे. पुढच्या कालावधीमध्ये हे सीम कार्ड लॉन्च व्हायचीही शक्यता आहे. या सीम कार्डनंतर आता पतंजलीनं व्हॉट्सअॅपला टक्कर दिली आहे. पतंजलीनं किंभो नावाचं मेसेजिंग अॅप लॉन्च केलं आहे. अब भारत बोलेगा या टॅग लाईननं पतंजली हे अॅप घेऊन आली आहे. किंभो अॅप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येणार आहे.
सीममध्ये मिळणार हे फायदे
या सिममध्ये १४४ रुपयांचे रिचार्ज केल्यास युझरला देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबचच २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. हे सिम सध्या केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठी लाँच करण्यात आलेय. मात्र जेव्हा हे सगळ्यांसाठी लाँच करण्यात येईल तेव्हा या सिम कार्डद्वारे युझरला पतंजलिच्या उत्पादनांवर १० टक्के सूट देण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर सिमचा वापर करणाऱ्या युझरला २.५ लाखापर्यंतचा मेडिकल इन्श्युरन्स मिळणार आहे. तसेच ५ लाखापर्यंतचा लाईफ इन्श्युरन्स मिळणार आहे.
'देशाची सेवा हेच लक्ष्य'
सिम लाँचिंगदरम्यान बोलताना रामदेव बाबा म्हणाले, बीएसएनएल हे स्वदेशी नेटवर्क आहे पतंजलि आणि बीएसएनएलचे देशाची सेवा करणे हेच लक्ष्य आहे. कंपनीचे लक्ष्य चॅरिटी करणे आहे. आमचे नेटवर्क केवळ स्वस्त डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत नाहीये तर लोकांना हेल्थ आणि लाईफ इश्युरन्सची सुविधाही देत आहे.