नवी दिल्ली : रिलायन्स जिओने मार्केटमध्ये उभे केलेले आव्हान परतवून लावण्यासाठी एअरटेलनेही कंबर कसली असून, नवे प्लान लॉंच केले आहेत. या प्लानमध्ये कॉल रेट कटर, टॉकटाईम आणि डेटा प्लान्स अशा ऑफर्सचा समावेश आहे. टेलिकॉम क्षेत्रात ऑपरेटर कंपन्यांकडून सध्या जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून या कंपन्यांमध्ये थेट ऑफर वॉर सुरू झाले आहे. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलने लॉंन्च केलेल्या प्लानपैकी सर्वात छोटा प्लान केवळ ८ रूपयांचा आहे. तर, ३९९चा प्लान हा सर्वात महाग प्लान आहे. मात्र, या प्लानचा लाभ घ्यायचा असेल तर, तुमचे कार्ड पोस्टपेड असता कामा नये. याचाच अर्थ असा की, हे सर्व प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत. ८ रूपयांच्या छोट्या प्लानमध्ये तुम्हाला ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच, सर्व लोकल आणि एसटीडी कॉल ३० पैसे प्रतिमिनीट दराने मिळतो. ४० रूपयांच्या प्लानमध्ये ३५ रूपयांचा टॉकटाईम दिला जातो. जो अनलिमिटेड काळासाठी वैध आहे. ६० रूपयांतही अनलिमिटेड काळासाठी प्लान उपलब्ध आहे. मात्र, या प्लानला ५८ रूपये इतका टॉकटाईम मिळतो.


एअरटेलचा इंटरनेट डेटा प्लानही स्वस्तात उपलब्ध झाला आहे. एअरटेल अवघ्या ५ रूपयांमध्ये 4GB डेटा देत आहे. त्याची वैधता ७ दिवस आहे. या ऑफर्सचे वैशिष्ट्य असे की, कोणत्याही युजरला ही ऑफर केवळ एकदाच वापरता येईल. तसेच, ही ऑफर आपल्या जुन्या 3G सिम कार्डला 4G मध्ये अपग्रेड करताना मिळेल.


कॅशबॅक ऑफर


एअरटेलने कॅशबॅक ऑफरही लॉंच केली आहे. एअरटेल पेमेंट बॅंक अकाऊंट ओपन केल्यावर तुम्हाला ३४९ रूपयांच्या रिचार्जवर १० टक्के कॅशबॅक मिळू शकतो. एअरटेलच्या १९९ रूपयांच्या प्लानवरही अनलिमिटेड एसटीडी कॉल सुविधा दिली जात आहे. याशिवाय २८ दिवसांसाठी 1GB डेटाही मिळत आहे.


काही मोठ्या ऑफर्स


दरम्यान, ३९९ रूपायांच्या रिचार्जमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसोबतच प्रतिदिन 1GB 4G डेटा मिळणार आहे. या शिवाय 84 दिवसांसाठी अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल सुविधाही मिळणार आहे. हा प्लान घेण्यासाठी अट अशी की, ग्राहकांनी कस्टमर केअरला फोन करून पहिल्यांदा विचारून घ्यावे की, ही ऑफर तुमच्या नंबरला लागू आहे किंवा नाही.


१४९ रूपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड एअरटेल टू एअरटेल कॉंलींग सोबतच 2GB 4जी डेटा मिळत आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.


दरम्यान, एअरटेलने ३९९ वाला प्लान जिओच्या ३९९ वाल्या प्लानला टक्कर देण्यासाठी लॉंच करण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिओ ३९९ च्या प्लानमध्ये अनलिमिटेड इंटरनेट डेटा सोबतच कॉलींग आणि मेसेजची सुविधाही देण्यात येत आहे.