मुंबई : 'रिलायन्स जिओ'चा सामना करण्यासाठी एकेकाळी प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांना जोरदार टक्कर देणाऱ्या कंपन्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया एकत्र येण्याची शक्यता आहे. एअरटेलचे सर्वे सर्वा सुनील भारती मित्तल यांनी फायबर ऑप्टिक नेटवर्कसाठी एक नवी संयुक्त कंपनी स्थापन करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं म्हटलंय. स्पेनमधील बार्सिलोनामध्ये त्यांनी ही माहिती दिली. येत्या काही दिवसात भारतात 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. पण सरकारनं सध्या निश्चित केलेल्या दरांवर एअरटेल स्पेक्ट्रम लिलावात सहभागी होऊ शकणार नाही, असंही मित्तल यांनी स्पष्ट केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांच्या म्हणण्यानुसार, व्होडाफोन आयडियानं त्यांच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. यापूर्वी, 'इंडस टॉवर्स' या टावर कंपनीसाठी भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानं हातमिळवणी केलेलीच आहे.


'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस' कार्यक्रमात मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरटेलनं व्होडाफोनला फायबर ऑप्टिक कंपनीत सहभागी होण्यासाठीही आमंत्रण दिलंय. दोन सदस्य असणारं हे जॉईंट व्हेन्चर असेल. आम्ही आमची फायबर कंपनी सुरू करणार आहोत.


भारती एअरटेलचा २.४६ लाख किलोमीटरच्या आपल्या फायबर असेटसाठी 'टेलिसॉनिक नेटवर्क लिमिटेड' नावानं एक नवीन कंपनी सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे आता दोन्ही कंपनीकडे मोठ्या प्रमाणात फायबर असेट आहेत. दोन्ही फायबर असेट एकत्र आले तर ही स्थिती दोन्ही कंपन्यांसाठी फायदेशीर ठरू शकेल. दोन्ही कंपन्यांची क्षमता २५ टक्क्यांनी वधारू शकेल, असंही आशा मित्तल यांनी व्यक्त केली.