`एप्पलच्या नव्या आयफोनमध्ये बॅटरी बॅकअप कमी`
या नव्या आयफोन 11 ची बॅटरी लाईफ कमी असल्याचा दावा एका कंपनीने आपल्या अहवालात केला आहे.
नवी दिल्ली : एप्पलच्या आयफोनची क्रेझ सध्या वाढताना दिसत आहे. प्रतिष्ठा दाखवण्यासाठी किंवा नुसती आवड म्हणून आयफोन घेण्यासाठी अनेकजण कोणत्याही थराला जातात. आयफोन घेतल्यानंतर घोड्यावरून वरात काढल्याचे किस्सेही आहेत. किंवा आयफोनसाठी घरातील दागिने विकल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यावरून आपल्याला आयफोनच्या क्रेझचा अंदाज येऊ शकतो. त्यात आता नवा 'आयफोन 11' हा सर्वांच्या भेटील येतोय. पण लाँच आधीच हा नवा आयफोन 11 वादात सापडला आहे. या नव्या आयफोन 11 ची बॅटरी लाईफ कमी असल्याचा दावा एका कंपनीने आपल्या अहवालात केला आहे.
साधारण 9 आयफोनवर यासाठी टेस्टिंग करण्यात आल्यानंतर हा खुलासा करण्यात आला आहे. किती बॅटरी बॅकअप असल्याचा दावा कंपनी करत आहे आणि प्रत्यक्षात किती आहे हे नव्या आयफोनच्या टेस्टिंगनंतर समोर आले आहे. उदाहराणार्थ आयफोन एक्सआरचा टॉकटाईम 25 तास असल्याचा दावा कंपनीर्फे केला जातो. पण प्रत्यक्षात मात्र तो 16 तास 32 मिनिटे असल्याचे स्पष्ट झाले.
या टेस्टिंगमध्ये एकूण पाच कंपन्यांचे मोबाईल फोन घेतले गेले. यामध्ये एप्पल सोबत एचटीसी, नोकीया, सॅमसंग आणि सोनी या ब्रॅण्डचे फोन होते. या सर्व कंपन्यांचे साधारण 50 मोबाइल फोनची टेस्टिंग करण्यात आली.
मोबाईल फोन हे दैनंदिन व्यवहाराची गोष्ट बनले आहेत. त्यामुळे कंपन्या मोबाईल बद्दल केलेला दाव्यावर खरे उतरतात का हे पाहीले गेल्याचे युकेतील ग्राहकहित कंपनी वीच ? ने म्हटले आहे. यानंतर अनेक मोबाईल फोनच्या बॅटरीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यासाठी फोन खरेदी करण्याआधी विश्वासातील किंवा जाणकारांकडून माहिती करुन घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येते.
एप्पलचे स्पष्टीकरण
एप्पल 11 च्या टेस्टिंगचे दावे खोटे असल्याचे एप्पलने म्हटले आहे. आमची बॅटरी बॅकअप सिद्ध करण्यासाठी आम्ही नियमित टेस्टिंग करत असतो. ज्याने जास्तीत जास्त बॅटरी बॅकअप मिळेल अशा रितीने आयफोनला बनवले जाते. आमच्या टेस्टिंगची पद्धत खूप वेगळी आहे. टेस्टिंग कंपनी 'वीच ?' ने त्यांच्या टेस्टिंगची पद्धत आम्हाला सांगितली नाही. त्यामुळे त्यांच्या रिझल्टवर आमची काहीच भूमिका नसल्याचे एप्पलने म्हटले आहे.