मुंबई : टेलीकॉम क्षेत्रामध्ये खळबळ माजवल्यानंतर रिलायन्स जिओ आता जिओ कॉईनच्या स्वरुपात क्रिप्टोकरन्सी घेऊन येईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. जिओ कॉईनची बातमी पूर्णपणे खोटी आहे. अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन रिलायन्स जिओकडून करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे रिलायन्स जिओनं हे स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी जिओ कॉईनच्या नावानं नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. '३१ जानेवारी २०१८ ला जिओ कॉईन १०० रुपयांमध्ये लॉन्च होईल. हा कॉईन घेण्यासाठी या लिंकवर रजिस्टर करा' असे मेसेज व्हायरल होत आहेत.


या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, ई-मेल आणि पासवर्ड देऊन रजिस्ट्रेशन करायला सांगितलं जातं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर 'इनव्हाईट फ्रेंड टू जॉईन रिलायन्स जिओ कॉईन' असा मेसेज येतो. मित्रासाठी जिओ कॉईन रेफर केल्यास तुम्हाला तीन जिओ कॉईन मिळतील, असं या मेसेजमध्ये सांगण्यात आलंय.


याचबरोबर डाऊनलोड ऍप फ्रॉम अवर स्पॉन्सर्सचा ऑप्शनही या साईटवर देण्यात आला आहे. स्पॉन्सरचं ऍप डाऊनलोड केलं तर १० जिओ कॉईन फ्री मिळतील, असं सांगितलं जात आहे. पण तुम्ही अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.