या नंबरवरून तुम्हालाही फोन येत असेल तर सावधान!
एअरटेलनं तर आपल्या ग्राहकांना अशा प्रकारच्या नंबरवरून कॉल आला तर लगेचच कस्टमर केअरला सूचित करण्याचे आदेश दिलेत.
मुंबई : जर तुम्हालाही भलत्याच एखाद्या नंबरवरून फोन येत असेल तर सावधान... कारण जर तुमच्या मोबाईलवर परदेशी नंबरवरून कॉल येत असेल आणि तुम्ही तो उचलला तरीही तुम्हाला चार्ज भरावा लागेल... किंवा अशा क्रमांकावर तुम्ही कॉल बॅक केला तरीही तुम्हाला त्याचा अधिकचा चार्ज लागेल. अर्थातच याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.
गेल्या आठवड्याभरापासून सायंकाळी किंवा रात्रीच्या दरम्यान सुरुवातीचा नंबर ९६ असलेल्या दहा अंकी नंबरवरून अनेकांच्या मोबाईलवर मिस कॉल मिळत आहेत. हे कॉल दक्षिण आशियाच्या मालदीवमधून हे कॉल येत असल्याचं चौकशीतून समोर आलंय. अशा वेळी अनेक मोबाईल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना याबद्दल सतर्क राहण्याचे मॅसेज पाठवून त्यांना अलर्ट केलंय.
मेरठ आणि इतर अनेक शहरातील नागरिक या कॉल्समुळे हैराण झाले आहेत. एअरटेलनं तर आपल्या ग्राहकांना अशा प्रकारच्या नंबरवरून कॉल आला तर लगेचच कस्टमर केअरला सूचित करण्याचे आदेश दिलेत.
सायबर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, असे कॉल मार्केटिंग कंपन्यांकडून व्हीओआयपीद्वारे केले जातात. कोणता मोबाईल नंबर सुरू आहे आणि कोणता बंद आहे, हे पडताळण्यासाठी हा फंडा वापरला जातो. या मार्केटिंग कंपन्या टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांचा डाटा खरेदी करून आपल्या प्रोडक्टचं मार्केट धुंडाळतात.