आता Twitter वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे? Elon Musk च्या ट्वीटमुळे एकच खळबळ
मस्क यांच्या ट्वीटमुळे आगामी काळात ट्विटरच्या धोरणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटरला आपल्या मालकीचं करुन घेतलं, त्यांनी ट्वीटरला काही दिवसांपूर्वीच 44 अब्जांना विकत घेतलं. ज्यामुळे सर्वत्र या गोष्टीची चर्चा सुरु आहे. ऐवढेच काय तर या गोष्टींवर सर्वांचेच मीम्स व्हायरल होऊ लागले आहे. त्यात आता एलॉन मस्क यांनी नुकतंच एक ट्वीट केलं, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मस्कने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, कदाचित व्यावसायिक/सरकारी वापरकर्त्यांना ट्वीटर वापरण्यासाठी किंमत मोजावी लागेल. मात्र, ट्विटरचा वापर सामान्य वापरकर्त्यांसाठी मोफत असेल, असे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात ट्विटरच्या धोरणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये काय लिहिलंय?
एलॉन मस्क यांनी ट्विट केले, "ट्विटर नेहमी अनौपचारिक वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल, परंतु व्यावसायिक/सरकारी वापरकर्त्यांना थोडी किंमत मोजावी लागेल."
एलॉन मस्कच्या या ट्विटनंतर ट्विटरवर चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत लोक अनेक प्रकारे ट्विट करत आहेत. अनेकजण समर्थनात तर अनेकजण याच्या विरोधात उभे राहिलेले दिसत आहेत.
ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साइट अलीकडेच एलोन मस्कने विकत घेतली आहे. यासाठी ४४ अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला आहे. सध्या ट्विटरचे सीईओ भारतीय वंशाचे पराग अग्रवाल आहेत, परंतु पराग अग्रवाल हे ती कंपनी सोडणार असल्याचे निश्चित असल्याचे मानले जात आहे. तसेच मस्क हे ट्विटरच्या नवीन सीईओच्या शोधात आहेत.