333 KM Range Electric Scooter: इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित रोज नवीन नवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. केवळ इलेक्ट्रिक कार आणि बाईक्सचं नाही तर इलेक्ट्रिक स्कूटरचाही वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक यासारख्या शहरांमध्ये कमी अंतरावर प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय फारच परवडणारा असल्याने इलेक्ट्रिक स्कूटरची संख्या वाढल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक स्कूटरच्या अगाऊ बुकींगमध्ये वाढ झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या गाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे नव्या तंत्रज्ञानानुसार त्या नॉन इलेक्ट्रिक गाड्यांइतकीच पॉवर जनरेट करतात. तसेच आता या स्कूटर लाँग रेंज म्हणजेच दिर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठीही वापरण्यास अधिक सक्षम होत आहेत. अशीच एक नवीन स्कूटर लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल होणार आहे.


कोणती आहे ही स्कूटर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्कूटरपैकी जवळजवळ सर्वच स्कूटर सरासरी 150 ते 200 किलोमीटरची रेंज देतात. मात्र नुकतीच प्रोडक्शन स्तरावर असलेली एक स्कूटर एका चार्जमध्ये तब्बल 333 किलोमीटरची रेंज देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या गाडीचं नावं आहे ब्रिस्क इव्ही (Brisk Ev). ही स्कूटर सध्या प्रोडक्शन फेजमध्ये आहे. हैदराबादमधील स्टार्टअप कंपनीच्या माध्यमातून ओरिजन आणि ओरिजनल प्रो नावाने या इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन व्हर्जन लॉन्च केले जाणार आहेत. नुकतीच या गाडीची झलक हैदराबादमधील ई-मोटार शोमध्ये व्हर्चूअल रिअॅलिटीच्या माध्यमातून जगाला पहायला मिळाली. ही गाडी लॉन्च होईल तेव्हा ती भारतामधील सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर असेल असा दावा कंपनीने केला आहे.


मुंबई-पुणे एका चार्जमध्ये...


ब्रिस्क कंपनीने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये कंपनीने आपल्या स्कूटरची रेंज किती असेल याचा संदर्भ दिला आहे. या पोस्टरवर, "मुंबई ते पुणे एका चार्जिंगवर" अशी ओळ लिहिली आहे. अर्थात आता या कंपनीने केलेल्या दाव्याप्रमाणे या इलेक्ट्रिक स्कूटरला एवढी रेंज देता आली तर स्कूटरवरुन मुंबईहून पुण्याला सिंगल चार्जमध्ये जाता येईल. सध्या कंपनीने रेंज आणि स्कूटर्सची नावं सोडून इतर कोणतीही माहिती दिलेली नाही. 


ब्रिस्क ओरिजीन कशी आहे?


या गाडीची खासियत सांगायची झाल्यास ब्रिस्क ओरिजीन हे बेसिक मॉडेल असेल. ही गाडी एका चार्जमध्ये 175 किमीपर्यंत धावेल. या गाडीची टॉप स्पीड 65 किमी प्रति तास इतकी असेल. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार गाडी 0 ते 40 किमी प्रती तास हा वेग अवघ्या 5 सेकंदांमध्ये पकडू शकते. यामध्ये 7 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. 


ब्रिस्क ओरिजीन प्रो कशी आहे?


ब्रिस्क ओरिजीन प्रो या मॉडेलबद्दल बोलायचं झाल्यास ही या कंपनीची प्रमियम स्कूटर असेल. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 333 किमीपर्यंत धावेल. या गाडीची टॉप स्पीड 85 किमी प्रति तास इतकी असेल. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार 0 ते 40 किमी प्रती तास वेग पकडण्यासाठी गाडीला केवळ 3.3 सेकंदांचा वेळ लागेल. यामध्येही 7 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. किंमतीसंदर्भात कंपनीने कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही.