केवळ ९८ रुपयांत बीएसएनएलची `डेटा त्सुनामी` ऑफर
जिओ नंतर बीएसएनएल ही दुसरी कंपनी ठरली आहे
मुंबई: बीएसएनएलने नव्या योजनेचे अनावरण केले आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन १.५ जीबी डेटा देण्यात येणार आहे. या योजनेचा कालावधी २६ दिवसांचा आहे. बीएसएनएलकडून या योजनेला 'डेटा त्सुनामी' नाव देण्यात आले आहे. मात्र, या योजनेत ग्राहकांना कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध होणार नाही. बाजारात इतर दूरसंचार कंपन्या ग्राहकांसाठी कॉम्बो योजना सादर करत आहेत. त्यात ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि डेटा पुरविला जात आहे. परंतु, बीएसएनएल या योजने अंतर्गत केवळ डेटाची सुविधा देणार आहे.
बीएसएनएलच्या या योजनेची तुलना जिओसोबत होणार आहे. रिलायन्स जिओ ९८ रुपयांच्या योजनेतून ग्राहकांना प्रतिदिन २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस ची सुविधा देत आहे. त्याचबरोबर अमर्यादित कॉलिंगही करता येते. या योजनेचा कालावधी १४ दिवसांचा होता. कालावधी वाढवून २८ दिवसांचा करण्यात आला आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) सांगितले की, बाजारात सर्वात जास्त ग्राहक जोडण्याचे काम जिओ नंतर बीएसएनएल ही दुसरी कंपनी ठरली आहे. सर्वात महत्वाची बाब अशी आहे की, बीएसएनएल दूरसंचार कंपनीजवळ अजूनही ४ जी नेटवर्क नाही. बीएसएनएल कंपनी ग्राहकांना ३ जी नेटवर्क प्रदान करते