नवी दिल्ली : चीनच्या बायटन या कार कंपनीने एक जबरदस्त कार आणली आहे. ही कार तुमचा चेहरा ओळखून अनलॉक होणार आहे. कंपनीने या इलेक्ट्रीक कॉन्सेप्ट कारला लास वेगासमध्ये सुरू असलेल्या CES 2018 मध्ये शोकेस केलं. 


यांनी केली कार तयार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BMW आणि अ‍ॅपलच्या माजी इंजिनिअर्स द्वारे ही कार तयार करण्यात आली आहे. या कारमध्ये आणखीही काही जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत. 


१५ ते ३० मिनिटात चार्ज होणार बॅटरी


या कारमध्ये ७१ किलोवॉट बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ४०२ किमी पर्यंतचा प्रवास करू शकते. या कारचं एक महागडं व्हर्जनही आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर ५२३ किमी प्रवास करू शकते. कंपनीने दावा केलाय की, १५ ते ३० मिनिटात या कारची बॅटरी चार्ज होईल. 


झक्कास इंटेरिअर


या कारचं इंटेरिअरही आकर्षक करण्यात आलंय. कारच्या सीटवर बसल्यावर लक्झूरिअस लिव्हिंग रूममध्ये बसल्याचा आनंद मिळणार असल्याचं बोललं जातंय. अ‍ॅमेझॉन एलेक्सासोबत यात व्हॉईस आणि जेस्चर कंट्रोलची सुविधाही देण्यात आलीये. 


मिरर ऎवजी कॅमेराचा वापर


या कारच्या दरवाज्यांना इन्व्हिजिबल हॅंडल लावण्यात आले आहे. साईड व्ह्यूसाठी मिररच्या जागी कॅमेराचा वापर केला आहे. या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे तुमचा चेहरा ओळखून ही कार अनलॉक करता येणार आहे. 


स्टेअरिंग व्हिलवर टचस्क्रीन


कंपनीने दावा केलाय की, स्टेअरिंगवर टचस्क्रीन असलेली ही जगातली पहिली अशी कार आहे. सोबतच या इलेक्ट्रीक कारमध्ये ४९ इंचाचा डॅशबोर्ड टचस्क्रीन डिस्प्ले दिलाय. हा डिस्प्ले नॅव्हिगेशन, एंटरटेन्मेंट आणि कारमध्ये बसलेल्या लोकांची हेल्थही मॉनिटर करतो. 


किती असेल कारची किंमत?


या शानदार इलेक्ट्रीक कारची किंमत ४५ हजार डॉलर(२८.६ लाख रूपये) पासून सुरू होणार आहे. २०१९ मध्ये ही कार चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.