भारतातील इलेक्ट्रॉनिक बाजाराला कोरोना व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता
बाजारात इलेक्ट्रॉनिक कच्च्या मालाची कमतरता भासू लागली आहे.
नवी दिल्ली : भारतातील इलेक्ट्रिक बाजारावर कोरोना व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता आहे. टीव्ही, रेफ्रिजरेटर, स्मार्टफोन आणि एसीसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट महाग होण्याची शक्यता आहे. भारताने २३ जानेवारीपासून चीनमधून कच्चा माल मागवणं बंद केलं आहे. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रॉनिक कच्च्या मालाची कमतरता भासू लागली आहे.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन कंपन्या डिस्काऊंट आणि ऑफर्स संपवत आहेत. त्यामुळे मोबाईलच्या किंमतीत ७ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर टीव्ही प्रोडक्टच्या किंमतींवर १० टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये व्यवसाय, फॅक्टरी, बाजार बंद झाले आहेत. चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उत्पादनं आयात केली जातात.
आयफोनची निर्मिती करणाऱ्या ऍपल कंपनीवरही कोरोना व्हायरसचा थेट परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय. आयफोनच्या सप्लाय चेनमध्ये समस्या येत आहेत. सप्लाय कमी झाल्याने याचा परिणाम उत्पादनावरही होत आहे. Apple आयफोनच्या पुरवठ्यावर सध्या वाईट परिणाम झाला आहे, त्यामुळे Appleचं जानेवारी ते मार्च या तिमाहीचं उत्पन्न कमी असण्याची शक्यता आहे. चीनमधील फॉक्सकॉन कंपनी ऍपलच्या आयफोन आणि इतर गॅजेट्सचं उत्पादन करते.
शाओमीने Xiaomi भारतात रेडमी नोट ८ स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. भारतीय स्मार्टफोन विक्रेता आणि भारतात स्मार्टफोन विकणाऱ्या विदेशी कंपन्या आतापर्यंतच्या चीनमधील शटडाऊनपासून सुरक्षित आहेत. मात्र येणाऱ्या काही दिवसांत किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चीनमधून मोबाईल चार्जर, मोबाईल कव्हर, बॅटरी, लॅपटॉप बॅटरी, मोबाईल टेंपर ग्लास, टॉर्च, खेळणी, इमरजेन्सी लाईट, ट्रिमर यासह अनेक उत्पादनांच्या किंमती वाढल्या आहेत. मोबाईलच्या अनेक पार्ट्सच्या किंमतीतही वाढ झाली आहे. टच पॅड आणि डिस्प्लेच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
कोरोना व्हायरसचा परिणाम, दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठ्या 'मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस (एमडब्ल्यूसी)' कार्यक्रमावरही झाला आहे. दूरसंचार कंपन्यांची, जागतिक संघटना जीएसएम असोसिएशनने कोरोना व्हायरससंबंधी, आरोग्याच्या चिंतेमुळे स्पेनच्या बार्सिलोना येथे होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस २०२० हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यक्रम २४ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होणार होता. या कार्यक्रमात वोडाफोन, सिस्को, एलजी, विवो, एनटीटी डोकोमो, सोनी, अमेझॉन, फेसबुक, मीडियाटेक आणि इंटेलसह अनेक कंपन्या सहभाग घेणार होत्या.