नवी दिल्ली : ऑनलाईन शॉपिंग केल्यावर वस्तूच्याऐवजी दगड किंवा साबण आल्याच्या बातम्या तुम्ही अनेकवेळा ऐकल्या असतील. याचाच आधार घेऊन दिल्लीतल्या एका २१ वर्षीय तरुणानं अमेझॉनला ५० लाखांचा गंडा घातला आहे. शिवम चोप्रा असं या युवकाचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवमनं वेगवेगळ्या फोन नंबरवरून आणि खोटा पत्ता देऊन १६६ स्मार्टफोन ऑर्डर केले. मोबईल घेऊन डिलिव्हरी बॉय खोट्या पत्त्यावर यायचा तेव्हा शिवम त्याला दुसऱ्याच पत्त्यावर बोलवून स्मार्टफोन घ्यायचा. हा फोन घेतल्यावर शिवम बॉक्समध्ये मोबाईलच नसल्याची तक्रार अमेझॉनला करून रिफंड घ्यायचा, आणि अमेझॉनवरून विकत घेतलेले फोन ओएलएक्सवर विकायचा.


अशा प्रकारे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शिवमनं अमेझॉनला ५० लाख रुपयांना गंडवलं. एकाच भागामध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणावर तक्रारी आल्यामुळे अमेझॉनचाही संशय वाढला. यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांना याबाबत तक्रार केली. दिल्ली पोलिसांनीही मग काही महिने चौकशी केली आणि शिवम चोप्राला अटक केली.


शिवमकडून दिल्ली पोलिसांनी १९ मोबाईल, १२ लाख रुपयांची रोकड आणि ४० बँक पासबूक आणि चेकबूक जप्त केली आहेत. शिवमला प्रत्येकी १५० रुपयाला प्री-अॅक्टिव्हेटेड सीम कार्ड देणाऱ्या एका दुकानदारालाही दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.