OLX वर तुम्हीही वस्तू विकण्यासाठी पोस्ट केली असेल तर सावधान...
अशावेळी खरोखरच वस्तू विकत घेणाऱ्यांसोबतच डिजिटली गंडा घालणाऱ्यांचीही तुमच्यावर पाळत असते, हे विसरू नका
मुंबई : तुम्हीही 'ओएलएक्स'सारख्या (OLX) वेबसाईटचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ओएलएक्ससारख्या वेबसाईटवरून तुमचा संपर्क सहजच उपलब्ध होऊ शकतो. अशावेळी तुमच्या अज्ञानाचा फायदा घेत एखादी व्यक्ती तुमच्याच मोबाईलद्वारेच तुम्हाला गंडवू शकते. त्यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटकाही बसू शकतो.
काय आहे मोडस ऑपरेंडी
तुम्ही 'ओएलएक्स'सारख्या वेबसाईटवर एखादी वस्तू विकण्यासाठी पोस्ट केल्यानंतर तुम्ही आपला संपर्क क्रमांकही सहज शेअर करता. अशावेळी खरोखरच वस्तू विकत घेणाऱ्यांसोबतच डिजिटली गंडा घालणाऱ्यांचीही तुमच्यावर पाळत असते, हे विसरू नका. त्यामुळे, कदाचित 'वस्तू विकत घेण्यासाठी इच्छूक आहे' असं सांगणाऱ्या व्यक्तीची शाहनिशा करणं गरजेचं आहे.
तुम्ही एखादी वस्तू विक्रीसाठी पोस्ट केल्यानंतर इच्छूक व्यक्ती वस्तू विकत घेण्यासाठी अतिउत्साह दाखवू शकतो. वस्तू प्रत्यक्षरित्या न पाहताच विकत घेण्यासाठी त्या व्यक्तीनं घाई दर्शवली तर कुठे तरी पाणी मुरतंय, हे लक्षात घ्या.
अशी व्यक्ती प्रत्यक्षरित्या वस्तू न पाहताही वस्तू विकत घेताना आपण 'डिजिटली पैसे तुम्हाला ट्रान्सफर करतो' असं सांगेल. परंतु हा केवळ एक फार्स असेल त्याला बळी पडू नका.
सदर व्यक्ती फोन पे, गूगल पे सारख्या ऍपवरून पैसे आत्ताच पाठवतो आणि उद्या-परवा वस्तू घेऊन जाईन असंही सांगेल. मी तुम्हाला पैसे पाठवले आहेत, एकदा खात्री करून घ्या... असंही तो तुम्हाला म्हणेन... पण तुमच्या डिजिटल खात्यात मात्र एव्हाना पैसे आलेले नसतात.
तुम्ही हे त्यांना सांगितल्यानंतर तो तुम्हाला नोटिफिकेशन चेक करायला सांगू शकतो... पैसे ऍपमध्ये पेन्डिंग असतील असा बहाणा करू शकतो... पण आपल्यापर्यंत पैसे पोहचलेले नसतात... ना आपल्याला काही पेन्डिंग दिसतं.
त्यावर ही व्यक्ती तुम्हाला एक 'क्यू आर' कोड पाठवतो... हा कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील असंही आश्वासन देतो... पण, सावधान... हा 'क्यू आर' कोड कदाचित 'पेमेंट क्यू आर कोड' असू शकतो. हा कोड स्कॅन केला तर तुमच्याच डिजिटल खात्यातून त्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. या क्यू आर कोडच्या खाली छोट्या अक्षरात 'प्लीज पे टू' असं लिहिलेलं असतं.
अशावेळी काय कराल
- तुम्हाला फोन करणाऱ्या व्यक्तीची खात्री करून घ्या... अतिउत्साहात समोरच्या व्यक्तीनं सांगितलेल्या गोष्टींवर लगेचच विश्वास ठेवू नका
- डिजिटली पैसे ट्रान्सफर करताना बँकेचा IFSC कोड आणि अकाऊंट नंबर देऊन पैसे ट्रान्सफर करायला सांगू शकता
- किंवा प्रत्यक्ष व्यक्तीनं वस्तू विकत घेतल्यानंतर तुम्ही त्याच्याकडून तेव्हाच पैसे रोख स्वरुपात घेऊ शकता. अशावेळी अनोळखी व्यक्तींना भेटतानाही योग्य ती काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्तींना घरचा पत्ता न देता सार्वजनिक आणि सुरक्षित ठिकाणीच भेटा
- आपली फसवणूक झालीच तर लगेचच त्याची तक्रार पोलिसांत नोंदवणं विसरू नका