तुमची कार गटागटा पेट्रोल डिझेल पिते का? या सोप्या टीप्सने करा इंधनाची बचत
इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या दरवाढीमुळे चारचाकी चालवताना खिशाला कात्री लागते. पण तुम्ही या काही सोप्या टीप्समुळे इंधनाची बचत करु शकणार आहात.
मुंबई - कार चालवताना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे तुमच्या खिशाला कात्री लागते. यामध्येच जर कारने कमी मायलेज देणे सुरु केले तर खर्चात आणखी वाढ होते. यासाठीच या साध्या सोप्या ट्रिक्स वापरा आणि कारचे चांगले मायलेज सुद्धा मिळवा. या टिप्सने तुम्हाला सुद्धा तुमच्या कारच्या मायलेजमधील फरक जाणवेल. कारचे मायलेज हे बरेचदा तुम्ही कशी कार ड्रायव्ह करता यावर सुद्धा अवलंबून असते.
क्लच, गियर आणि ब्रेकचा योग्य वापर
क्लच आणि ब्रेक याचा गाडी चालवताना योग्य वापर करा. ड्रायव्ह करताना क्लच वर वारंवार पाय ठेवु नका यामुळे मायलेज वर फरक पडतो. तसेच कार नेहमी योग्य गियरवर टाकुनच ड्रायव्ह करावी. जिथे गरज असेल तिथेच गाडीला ब्रेक लावा. कारण ब्रेक लावुन जेव्हा तुम्ही परत स्पीड वाढवता त्या स्थितीत मायलेज काही प्रमाणात कमी होते.
टायर प्रेशर
टायरच्या प्रेशरची नेहमी काळजी घ्या, गाडीतील चारही टायर्समध्ये प्रेशर योग्य असले पाहिजे. दर आठवड्याला कमीत कमी एकवेळा तरी टायरमधील प्रेशर चेक करत राहा. जर टायर्समध्ये कमी हवेचा प्रेशर असेल तर त्याचा परिणाम मायलेज वर सुद्धा जाणवतो, त्यामुळे वेळोवेळी टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे.
स्पीड नियत्रंणात ठेवा
कारचे चांगले मायलेज मिळवण्यासाठी गाडी चालवताना स्पीड योग्य राखणे गरजेचे असते. कार चालवताना एकाच स्पीडवर कार चालवा वारंवार स्पीड बदल्यास त्याचा परिणाम मायलेजवर होतो. हायवेवर कार चालवताना चांगले मायलेज मिळावे याकरिता साधारण 70 ते 90kmpl च्या स्पीडवर गाडी चालवा.
कार मेंटेनेंस आणि सर्विसिंग
कार नीट मेंटेन करण्यासाठी सर्विसिंग करणे गरजेचे असते, योग्य सर्विसिंग केल्याने मायलेज मिळवण्यासाठी मदत होते. कार जुनी असेल अथवा नवी वेळीच सर्विस करणे गरजेचे असते. वर्षातुन एकदा तरी किंवा तुमची कार दहा हजार किलोमीटर धावल्यानंतर तुम्ही कार सर्विसिंग करुन घ्या.