मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मारुती सुझुकी पुढील वर्षात नवी गाडी बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ही गाडी जानेवारी २०१९ ला लॉन्च करण्यात येणार आहे. सूत्रांनुसार, ही गाडी २३ जानेवारीला लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीला वॅगन आरच्या नव्या मॉडेलकडून खूप अपेक्षा आहेत. मारुतीची आल्टो  ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस पडत नसल्याने तिची मागणी कमी झाली आहे. मारुती आल्टो या गाडीच्या विक्रीत नोव्हेंबर २०१८ मध्ये अचानक घट झाली. 


डिझायरला ग्राहकांची पसंती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुतीने एप्रिल-नोव्हेंबर या महिन्यांत डिझायरच्या एकूण एक लाख ८२ हजार १३९ गाड्यांची विक्री केली होती. एक वर्षाआधी या कालावधीतच एक लाख ५३ हजार ३०३ गाड्या विकल्या होत्या. मारुती कंपनीची आकाराने लहान असलेली मारुती आल्टो ही गाडी सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. एप्रिल-नोव्हेंबर २०१८ मध्ये एक लाख ६९ हजार ३४३ आल्टो गाड्यांची विक्री झाली. तर एक वर्षाआधी याच कालावधीत एक लाख ७५ हजार ९९६ गाड्यांची विक्री झाली होती.


किंमतीत फरक नाही


सूत्रांनुसार, ग्राहक वॅगन आरच्या नवा लूक असलेल्या गाडीची आवर्जून वाट पाहत आहेत. या गाडीचे अनावरण कंपनी धडाक्यात करेल अशी आशा आहे. नवी वॅगन आर गाडी ही सुविधांयुक्त असणार आहे. नवीन मॉडेल जुन्या मॉडेलच्या तुलनेत आकाराने मोठे असणार आहे. या नव्या गाडीच्या किंमतीत फार काही तफावत असणार नाही.


अत्याधुनिक सुरक्षा सुविधा


नव्या गाडीची संरचना जुन्या गाडीच्या तुलनेत अत्याधुनिक आहे. तसेच इंटेरिअर उत्तम दर्जाचे आहे. या नव्या गाडीत अत्याधुनिक डॅशबोर्ड, रिवाईज इंस्ट्रुमेट पॅनेल आणि टचस्क्रिन सिस्टम असण्याची शक्यता आहे. ही शक्यता यासाठी वाढली आहे कारण याआधी ह्युंदाई सॅंट्रो या गाडीत देखील याच प्रकारचं इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आले होते. नव्या गाडीत ड्युअल एअरबॅगचा समावेश आहे. सोबतच एबीएस, रिवर्स पार्किंग सेंसर, चाईल्ड सीट फिटमेंट (लहान मुलांसाठी उपयुक्त आसनव्यवस्था), आणि वेगमर्यादेची सूचना आणि सीटबेल्ट रिमाईंडर यासारखी सुरक्षा उपकरणे असण्याची शक्यता आहे.


असं असेल इंजिन 


नव्या वॅगन आरच्या इंजिनाबद्दल सांगायचे तर जुन्या मॉडेलच्या तुलनेत यात काही बदल होण्याची चिन्हे नाहीत. वॅगन आरच्या जुन्या मॉडेलमध्ये एक लीटर, तीन सिलिंडर के सीरिजचं पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनची क्षमता ६७ bhp इतकी आहे. तर ९० nm टॉर्क निर्माण करते. नव्या गाडीत पाच स्पीड मॅन्यूअल आणि स्वयंचलित ट्रान्समिशन मिळणार आहे. ही नवी गाडी, सीएनजी-पेट्रोल आणि एलपीजी-पेट्रोल फ्यूअल इंजिन या दोन पर्यायांत उपलब्ध असणार आहे.