मुंबई : भारतीय पोस्ट विभागानं शुक्रवारी एक महत्त्वाची घोषणा केलीय. तंत्रज्ञानाचा वापर करून आता पोस्टही आपलं रुपडं बदलायला सज्ज झाल्याचं दिसतंय. भारतीय पोस्ट लवकरच फ्लिपकार्ट आणि अमेझॉनप्रमाणे 'ई- कॅामर्स' क्षेत्रात उतरणार असल्याचं दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटलंय. वस्तूंची डिलीव्हरी करण्यासाठी भारती पोस्ट आपल्या देशभर विस्तारलेल्या नेटवर्कचा आधार घेणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय पोस्ट विभाग ई-कॉमर्स सेवांसाठी त्यांच्या नेटवर्कचा लाभ घेतील. यावेळी, सिन्हा यांनी भारतीय पोस्ट विभागाचं ई-कॅामर्स पोर्टलदेखील सादर केलं. 


सध्या भारतात ई-कॅामर्स बाजारात अमेझॅान (Amazon)आणि फ्लिपकार्ट (Flipkart) यांचा दबदबा आहे. भारतीय पोस्ट विभागाचे संपूर्ण भारतात विशाल नेटवर्क आहे. जर भारतीय पोस्ट विभाग ई-कॉमर्समध्ये क्षेत्रात उतरलं तर यामुळे अमेझॅान आणि फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्यांना जोरदार टक्कर मिळू शकते.  


पार्सल डिलीव्हरी दरात किंवा प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या सेवांसह स्पर्धा, तसेच दर बदलण्यासाठी सर्वोच्च अधिकाऱ्यांकडून मान्यता प्राप्त करणे आवश्यक आहे. पोस्टाद्वारे ई-कॉमर्स व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागामध्ये नोंदणी करावी लागेल. भारतीय पोस्ट विभाग विक्रेत्यांकडून उत्पादनं घेऊन ती ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचं काम करेल, असंही सिन्हा यांनी स्पष्ट केलंय. 


भारतात १ लाख ५५ हजार टपाल कार्यालय आहेत. त्याचबरोबर त्यांचे नेटवर्क अतिशय दुर्गम भागात असलेल्या गाव-खेड्यांमध्येही पोहचलेलं आहे. भारतीय पोस्ट विभागाचे सचिव ए.एन. नंदा यांच्या माहितीनुसार, ज्या प्रकारे इतर ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांकडून वस्तू परत घेण्याचीही सुविधा देतात त्याचप्रमाणे भारतीय पोस्ट विभागही वस्तू परत घेण्याची सुविधा पुरवेल... या सेवांचं कठोरपणे निरीक्षण करून ग्राहकांना उत्तमोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही आश्वासन नंदा यांनी दिलंय.