यूरोपीय संघ देशात सिंगल मोबाईल चार्जिंग पोर्टला मंजुरी, ॲपल कंपनीला फटका
सध्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र स्मार्टफोन चार्जिंगसाठी वेगवेगळे चार्जर वापरावे लागतात.
नवी दिल्ली: सध्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र स्मार्टफोन चार्जिंगसाठी वेगवेगळे चार्जर वापरावे लागतात. त्यामुळे अनेकदा मनस्ताप होतो. मात्र युरोपीयन देशांनी यासाठी एक प्रस्ताव पास केला आहे. या प्रस्तावानुसार युरोपीयन संघ देशात मोबाईल, टॅब्लेट आणि हेडफोन्ससाठी एकाच चार्जिंग पोर्ट असणार आहे. यामुळे ग्राहकांचा फायदा होणार असून सामान्य लोकांच्या पैशांची बचत होणार आहे. या निर्णयाचा ॲपलला फटका बसला आहे. त्यामुळे ॲपलला 2024 पर्यंत युरोपमध्ये विकल्या जाणार्या आयफोन्सचे कनेक्टर बदलावे लागणार आहेत.
आयफोन आणि अँड्रॉइड युजर्सकडून त्यांच्या डिव्हाइसेससाठी वेगवेगळ्या चार्जरवर स्विच करावे लागण्याच्या तक्रारींमुळे ब्रुसेल्स एका दशकाहून अधिक काळ एकाच मोबाइल चार्जिंग पोर्टसाठी जोर देत होतं. अखेर त्याला यश मिळालं आहे. आयफोन लाइटनिंग केबलवरून चार्ज केले जातात, तर अँड्रॉईड आधारित डिव्हाइस USB-C कनेक्टर वापरतात.
2019 च्या आयोगाच्या अभ्यासानुसार, 2018 मध्ये मोबाइल फोनसह विकल्या गेलेल्या निम्म्या चार्जरमध्ये USB मायक्रो-बी कनेक्टर होते, तर 29% मध्ये USB-C कनेक्टर आणि 21% लाइटनिंग कनेक्टर होते. "2024 पर्यंत, यूएसबी टाइप-सी युरोपमधील मधील सर्व मोबाइल फोन, टॅब्लेट आणि कॅमेर्यांसाठी सामान्य चार्जिंग पोर्ट बनेल," असं युरोपियन संसदेने एका निवेदनात म्हटले आहे.