नवी दिल्ली - तंत्रज्ञानाने वेढलेल्या जगात सध्या सर्वच जण कॉल ड्रॉप समस्येने हैराण झाले आहेत. आपणच कशाला अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कॉल ड्रॉपच्या समस्येने त्रस्त आहेत. परंतु आता कॉल ड्रॉप आणि स्लो इंटरनेट कनेक्शनमुळे त्रस्त असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. आयआयटी मुंबईच्या शिक्षकांनी एक असा उपाय शोधून काढला आहे ज्याच्या मदतीने ही समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक प्रसन्ना चापोकर, अभय करंदीकर आणि अरघदीप रॉय यांनी दोन अल्गोरिदम प्रस्तावित केले आहेत. जे डेटा स्पीडमध्ये वेग आणू शकतात आणि हेटनेट्सच्या मदतीने कॉल ड्रॉपच्या समस्येला कमी करू शकतात. सेल्युलर आणि वाय-फाय नेटवर्कच्या संयोजकांना हेटनेट्स म्हटले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन अल्गोरिदमच्या अंतर्गत एक असे केंद्रीय नियंत्रक बसवण्यात आले आहे जे प्रत्येक सेल टॉवर आणि वाय-फाय अॅक्सेस पॉईंटवर नजर ठेऊ शकेल. याच्या मदतीने डेटा आणि व्हॉईस कॉलचे व्यवस्थापन निश्चित केले जाईल. या अंतर्गत डेटा सर्व्हिसेसचा योग्य उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे सेल टॉवरवरील दबाव कमी केला जाऊ शकतो. प्राध्यापक प्रसन्ना चापोकर यांनी सांगितले की, आमचा उद्देश प्रत्येक वापरकर्त्याला सर्वोत्तम डेटा दर मिळवून देणे तसेच व्हॉईस कॉल ड्रॉपची समस्या मर्यादित ठेवणे हा आहे.


या शोधांतर्गत, नेटवर्कमधील उपकरणांच्या वापरासाठी वाय-फाय आणि सेल्युलर डेटा यांपैकी एकाची निवड करण्यासाठी दोन वेगवान आणि कुशल अल्गोरिदमचा प्रस्ताव देण्यात आला आहे. व्हॉईस कॉलसाठी एका योग्य चॅनेल क्षमतेची आवश्यकता असते. परंतु हे चॅनेल उपलब्ध नसल्यास कॉल ड्रॉप होऊ शकतो. ही समस्या सेल्युलर नेटवर्कच्या सेलमधील वापरकर्त्यांची संख्या वाढल्यास अधिक होऊ शकते. अशाप्रकारे, जेव्हा कोणताही वापरकर्ता नेटवर्कमध्ये येतो की जातो त्यावेळी केंद्रीय नियंत्रकाला चॅनेलच्या क्षमतेला पुन्हा एकत्रित करण्याची आवश्यकता असते. या प्रक्रियेत वापरकर्त्याला सेल्युलर डेटा कनेक्शनमधून वाय-फाय डेटामध्ये आणले जाऊ शकते. ही प्रक्रिया विशेषत: ५जी नेटवर्कमध्ये वापरली जाऊ शकते.