स्क्रीन रेकॉर्डर अॅपमधून थेट मोबाईलमध्ये शिरकाव; लगेचच डिलीट करा नाहीतर...
Screen Recorder App : ट्रोजनच्या मदतीने हे अॅप तुमच्या स्मार्टफोनधील ऑडिओ, व्हिडिओ आणि वेबपेजमध्ये काय सुरु आहे याचा तपास करु शकत होते. यासोबत सायबर गुन्हेगार या माध्यमातून तुमच्या मोबाईलचा एक्सेस घेऊन कोणतीही गोष्ट सहजपणे अपलोड करु शकत होता.
Screen Recorder App : जर तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये स्क्रीन रिकॉर्डिंगसाठी (Screen Recording) अॅप असेल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. दररोज काही नवीन मालवेअर किंवा व्हायरस (Virus) अँड्रॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये घुसत असतात आणि युजर्सचा डेटा चोरी करतात. यामुळे युजर्सचं मोठया प्रमाणावर नुकसान होतं. आता असेच एक अॅप समोर आले आहे ज्याचा वापर करुन तुमच्या मोबाईलमधला डेटा चोरला जात होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुगल प्लेवरुन हे अॅप 50,000 हून अधिक वेळा डाउनलोड केले गेले. मात्र आता हे अॅप Play Store वरून काढून टाकण्यात आले आहे. पण युजर्सना आता त्यांच्या मोबाईलमधूनही हे अॅप काढून टाकावं लागणार आहे. नाहीतर तुमचा डेटा चोरीला गेलाच म्हणून समजा.
गुगलने नुकतेच अॅप प्ले स्टोअरवरुन हटवल्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे. या अॅपच्या मदतीने यूजर्सची स्क्रीन रेकॉर्ड केली जात होती. मात्र त्यासोबत त्याचा डेटा देखील चोरीला जात असल्याचे समोर आले आहे. ESETच्या संशोधकांच्या अहवालानुसार, iRecorder नावाच्या अॅपच्या माध्यमातून हा सर्व धक्कादायक प्रकार सुरु होता. हे अॅप सप्टेंबर 2019 मध्ये Google Play Store वर पहिल्यांदा अपलोड करण्यात आले होते. एका वर्षानंतर अॅपला ओपन-सोर्स AhMyth Android RAT (रिमोट ऍक्सेस ट्रोजन) ने हल्ला केला. ज्यांच्याकडे हे अॅप होते त्यांनी ते अपडेट करताच या व्हायरसने त्यांच्या मोबाईलमध्ये शिरकाव केला. बघता बघता हा मालवेअर सगळ्याच मोबाईलमध्ये पसरला.
या अॅपद्वारे युजर्सच्या डेटासोबत त्यांची वैयक्तिक माहिती देखील चोरली जात होता. यामधून युजर्सच्या फाईल्स सायबर गुन्हेगारांना पाठवल्या जाऊ शकतात. स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी असलेल्या या अॅपला 5 पैकी 4.2 स्टार इतके रेटिंग मिळाले आहे. म्हणजेच हे अॅप स्क्रीन रेकॉर्डिंगसह बाकीचे कामे मागच्या मागे करत होता. अॅपच्या सुरुवातीला कोणतीही घुसखोरी होत नव्हती. मात्र जसे हे अॅप अपडेट झाले तसा युजर्सचा डेटा धोक्यात आला. सायबर हल्लेखोर त्यांच्या कमांड-अँड-कंट्रोल (CoC) सर्व्हरद्वारे रिअल-टाइममध्ये युजरच्या डिव्हाईसमध्ये सुरु असलेल्या गोष्टींवर लक्ष ठेवू शकत होते. व्हिडिओ, ऑडिओ, ईमेज, वेबपेज, दस्तऐवज आणि कंप्रेस्ड फाइल्स या सर्वांवर सायबर गुन्हेगार लक्ष ठेवू शकत होते.
यासोबत या अॅपच्या माध्यमातून युजर्सच्या फोनवरून ऑडिओ रेकॉर्ड करणे, स्क्रीन रेकॉर्ड करणे, इमेज कॅप्चर करणे, डिव्हाइसचे लोकेशन ट्रॅक करणे आणि फोनमध्ये असलेल्या फाइल्सची तपासणी करणे यासारख्या गोष्टी करू शकत होते. मात्र ही बाब लक्षात येताच गुगलने हे अॅप प्ले स्टोअरवरुन काढून टाकले. त्यामुळे तुमच्या डिव्हाइसमध्ये हे अॅप असल्यास, ते लगेच काढून टाका.