खुशखबर! `टू व्हीलर्स`साठी `गुगल मॅप` अॅप दाखवणार शार्टकट रूट
दुचाकी स्वारांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एक सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार
मुंबई : रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. केवळ याच नव्हे तर, सर्वच दुचाकी स्वारांसाठी गुगल कामी येणार आहे. त्यासाठी गुगल एक मॅप अॅप लॉंच करणार असून, या अॅपद्वारे दुचाकीस्वारांना शार्टकट रूट शोधणे सोपे जाणार आहे.
दुचाकीस्वारांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका
रस्त्यावरून गाडी चालवताना वाहतूक कोंडीने आपण सर्वचजण हैराण होतो. चारचाकी गाड्यांची रस्त्यांवर रांगच रांग लागली असताना दुचाकीवाले मात्र, मिळणाऱ्या इवलूशा जागेतून पुढे पुढे जाताना दिसतात. अशा वेळी त्या दुचाकीस्वारांकडे काहीशी असूया आणि काहीसा राग अशा भावमुद्रेने पाहणारे गाडीतील चेहरे पाहणे मोठे मजेशीर असते. गुगलच्या नव्या टू-व्हीलर मॅप अॅपमुळे या चेरऱ्यांमध्ये आता वाढ होणार आहे. कारण, मॅप अॅपमुळे दुचाकीस्वारांचे काम आणखी सोपे होणार असून, त्यांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एक सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार आहे.
गुगल मॅप अॅप ठरले आकर्षण
गेल्या आठवड्यात 5 डिसेंबरला राजधानी दिल्ली येथे Google for India नावाचा एक मोठा इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये गुगलने एक मोठी घोषणा केली. Google for India हे एक वार्षीक संमेलन आहे. ज्याचे यंदा तिसरे वर्ष आहे. 2015 मध्ये भारतात पार पडलेल्या Google for Indiaच्या इव्हेंटला गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी होस्ट केले होते. तसेच, तेच या इव्हेंटचे प्रमुख आकर्षण होते. या वेळी इव्हेंटमद्ये JioPhoneसाठी गुगल असिस्टंट सपोर्ट, गुगल गो आणि गुगल मॅप्समध्ये टू व्हिलर फीचर्स सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू राहिला.
टू-व्हिलर रूट मॅप अॅप कसे करेन काम?
गुगलने हे अॅप लॉंच केल्यावर त्याचा मोठा फायदा दुचाकीस्वारांना होणार आहे. जे लोक दुचाकीवरून लांबचा प्रवास करतात किंवा अगदी किचकट आणि गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चालवतात अशा लोकांसाठी हे अॅप अत्यंत महत्त्वाची कामगिरी करणार आहे. आपण थांबलेल्या ठिकाणापासून आपल्याला पोहोचायचे असलेल्या निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी गुगलचे हे टू-व्हिलर मॅप अॅप 'मार्ग'दर्शन करणार आहे. हे अॅप जिथे चारचाकी वाहान किंवा रिक्षाही जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी पोहोचण्यासाठीही 'मार्ग'दर्शन करणार आहे. या आधी गुगल कार, बस, पादचारी आणि रेल्वे मार्गांसाठी ऑप्शन दाखवत होते. मात्र, आता त्यात दुचाकींसाठी रस्ते दाखवण्याचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कसे आहे व्हर्जन? कसा कराल वापर?
गुगल मॅपचे हे फिचर अॅप अँड्रॉईड व्हर्जन v9.67.1 युक्त आहे. जर तुम्हाला तुमच्या गुगल मॅप मध्ये हे फिचर दिसत नसेल तर, तुमच्या गुगल मॅपला अपडेट करा. गुगलने या फीचरला मोटरसायकल मोड असे नाव दिले आहे. अपडेट होताच हे अॅप तुम्हाला योग्य ते 'मार्ग'दर्शन करेन.
अॅप ओपन करताच तुमचे सध्याचे लोकेशन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते लोकेशन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाल कार, बाईक, बस आणि पादचारी असे ऑप्शन दिसतील. त्यापैकी, बाईक मोड सिलेक्ट करा. तुम्हाला मार्गदर्शन मिळेल.