स्नेहल पावनाक, झी मीडिया, मुंबई : प्रेम म्हटलं की प्रत्येकाचंच हृदय धडधडतं. प्रेमात आणि मैत्रीत रेड हार्टला एक वेगळच महत्व आहे. रेड हार्ट(लाल ह्रदय) हे प्रेमाचे प्रतिक आहे. पण सध्या सोशल मीडियावर जांभळ्या रंगाचा ह्रदय म्हणजे पर्पल हार्ट ट्रेंड होत आहे. कारण हे हार्ट मैत्रीरुपी प्रेमाचं प्रतिक आहे. सध्या हा ट्रेंड चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. या पर्पल हार्टसोबतच #HeartTheHate हा हॅशटॅगही सध्या फार ट्रेंडीग होत आहे. फ्रेंडशीप डेच्या दिवसापासून कॅडबरीने सुरु केलेला हा ट्रेंड ट्रोलिंगविरोधात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया अत्यंत महत्त्वाचं प्रसार माध्यम आहे. याचे अनेक फायदे आहेत. पण अलीकडे सोशल मीडियावर ट्रोल करणं वाढलं आहे. अगदी जनसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत या नेटकऱ्यांपासून कोणीच सुटलेलं नाही. सोशल मीडियावर आपले कपडे, बोलणे, वागणे, राहणीमान अशा लहान मोठ्या अनेक कारणांवरुन कधी आपली मित्रमंडळी तरी कधी नेटकरी ट्रोल करत असतात. कधी-कधी या संदर्भात अश्लील शब्दप्रयोगही केले जातात. यामुळे मानसिक त्रास तसेच खच्चीकरण ही होतं...अशा वेळी ट्रोलिंगची विरोध कसा करायचा हा प्रश्न पडतो...


यालाच उत्तर म्हणून कॅडबरीने #HeartTheHate हा ट्रेंड जाहिरातीतून सुरु केला आहे. जांभळा रंग हा मन स्थिर करुन भीतीवर मात करण्यास मदत करतो. ट्रोलिंगला खचून न जाता पर्पल हार्ट पाठवा आणि आपल्या मित्राला साथ द्या असा संदेश कॅडबरीने आपल्या जाहिरातून देण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत ट्रोलिंग थांबत नाही तोपर्यंत पर्पल हार्ट पाठवून आपल्या मित्राच्या पाठिशी ठामपणे उभे राहाण्याचा संदेश या सोशल मीडियाच्या ट्रेंडमधून देण्यात आला आहे.



अवघ्या काही दिवसांतच या ट्रेंडला सर्वच स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक टीव्ही कलाकारांनी सुद्धा या ट्रेंडला समर्थन देत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वत:च्या नावासोबत पर्पल हार्ट लिहिले आहे. ट्रोलिंग थांबविण्यात हे पर्पल हार्ट किती प्रभावी ठरेल हे येत्या काळातच कळेल.