थेट Electric Poll च्या तारांमध्ये अडकली स्कूटी! जमिनीपासून 15 फुटांवर कशी पोहोचली?
Scooty Entangled In Wires on Electric Poll: सोशल मीडियावर या स्कूटीचे व्हिडीओ आणि फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. जमीनीपासून जवळजवळ 15 फुटांवर ही स्कूटी लटकत असल्याचं दिसत आहे.
Scooty Entangled In Wires on Electric Poll: गाडीचा अपघात झाल्यानंतर गाडी एखाद्या खड्ड्यात पडली, नाल्यात पडल्याचं तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेल. त्यातही गाडी पार्क करताना अपघात झाल्याचेही प्रकरण तुम्ही अनेकदा ऐकली असतील. मात्र गाडी चक्क एखाद्या विजेच्या खांबांवरील तारांमध्ये अडकल्याचं तुम्ही नक्कीच ऐकलं नसेल. पण खरोखरच असा एक प्रकार नुकताच भारतात घडला असून जमीनीपासून काही फूट वर विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या दुचाकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी मजेदार कॅप्शन्ससहीत हा व्हिडीओ शेअर केला आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये...
सोशल मीडियावर या तारांमध्ये लटकलेल्या स्कूटीची अवस्था पाहून अनेकांना ही स्कूटी इथपर्यंत पोहचलीच कशी असा प्रश्न पडला आहे. काहींनी अरे ही पार्क केलीय की असा उपहासात्मक प्रश्नही विचारला आहे. इंटरनेटवर या व्हायरल फोटो आणि व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. स्वाती नावाच्या एका महिलेनेही "बाळा स्कूटी सुरक्षित जागी पार्क कर" असं सांगितलं असता तरुणीने अशी स्कूटी पार्क केल्याची कॅप्शन देत व्हिडीओ शेअऱ केला आहे. मात्र नेमकं हे सारं घडलं कसं यामागील घटनाक्रमही या फोटो, व्हिडीओंसारखाच रंजक आहे.
हे सारं घडलं कसं?
जम्मू-काश्मीरमध्ये हा स्कूटी विजेच्या तारांमध्ये अडकण्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सायंकाळी या ठिकाणी जोरदार वादळ आलं होतं. या वादळामध्ये रस्त्याच्या कडेला पार्क केलेली ही स्कूटी हवेत उडाली आणि थेट या विजेच्या तारांमध्ये जाऊन अडकली. जमीनीपासून जवळजवळ 15 फूट उंचीवर ही स्कूटी अडकली. लोकांना हे फोटो आणि व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. विजेच्या खांबावरील तारांमध्ये लटकलेली ही स्कूटी पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. या स्कूटीचे फोटो आणि व्हिडीओही तुफान व्हायरल झालं. त्यानंतर क्रेनच्या मदतीने ही स्कूटी खाली उथरवण्यात आली. त्यामुळेच सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांप्रमाणे काहीही घडलेलं नाही. ही स्कूटी कोणत्याही अपघातामुळे नाही तर नैसर्गिक आपत्तीमुळे या विजेच्या तारांमध्ये अडकल्याचं स्पष्ट झालं आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही.
लाईक्स, कमेंट्स अन् मिम्स...
लाखो लोकांनी हा व्हिडीओ तसेच या गाडीचे फोटो सोशल मीडियावर लाईक आणि शेअर केले आहेत. या गाडीबरोबर नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज बांधत या पोस्टवर हजारो कमेंट्सही आल्या आहेत. अनेकांनी ही गाडी पाहून पार्किंगसंदर्भात मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी तर यावरुन मिम्सही तयार केले आहेत.