6.5 कोटी सॅलरी तरी `या` भारतीयानं नोकरी सोडली! झुकरबर्गची कंपनी सोडण्याचं खरं कारण सांगितलं
Indian Origin Techie Quits Meta: त्याला मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटा कंपनीमध्ये त्याचं काम पाहून प्रमोशनही मिळालं होतं. मात्र त्यानंतरही त्याने तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला.
Indian Origin Techie Quits Meta: भारतीय वंशाच्या राहुल पांडे नावाच्या तरुणाने फेसबुकची मातृक कंपनी असलेल्या 'मेटा' कंपनीला सोडचिठ्ठी दिली आहे. मार्क झकरबर्ग यांच्या मालकीच्या 'मेटा'मध्ये लीड इंजीनियअर आणि मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या राहुलने राजीनामा दिला आहे. राहुलचं वार्षिक पॅकेज 6.5 कोटी रुपयांहून अधिक होते. एवढा पगार असूनही राहुलने 2022 मध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय़ घेतला. या निर्णयानंतर अनेक महिन्यांनी त्याने एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी अशी तडकाफडकी का सोडली याबद्दलचा खुलासा केला आहे.
प्रवास सोपा नव्हता
अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये फेसबुकबरोबर काम करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल राहुलने 'बिझनेस इनसायडर'शी बोलताना माहिती दिली. "नोकरी करताना मला अस्वस्थ वाटणं, चिडचिड होणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं," असं राहुल म्हणतो. राहुलने त्याच्या लिंक्डइन पोस्टवरही यासंदर्भातील पोस्ट केली आहे. "एका वेळेला 100 डॉलर्सपर्यंतची बीलं भरण्याचा माझा प्रवास एवढा सोपा नव्हता. फेसबुकमध्ये कामाला सुरु केल्यानंतर मी 6 महिन्यांपासून फारच चिंतेत होतो. एक वरिष्ठ इंजीनियर म्हणून मी नाटक करतोय की काय असं वाटतं होतं. मला या कंपनीमधील वर्क कल्चर आणि येथील संस्कृती तसेच टूलींग समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी संघर्ष करावा लागाला," असं राहुल पांडे म्हणाला.
हकालपट्टीची भीती
"काम करताना कोणाचीही मदत मागताना अडखळल्यासारखं व्हायचं. जी व्यक्ती सिनियर इंजीनिअर होण्याच्या क्षमतेची नाही तिची हकालपट्टी कंपनीकडून केली जाईल असं वाटायचं. मी कंपनी जॉइन केल्यानंतर फेसबुकन कंपनीचाही संघर्ष सुरु झाला. फेसबुकचे शेअर्सही मोठ्या प्रमाणात पडले. कंपनीमध्ये येऊन मला केवळ एक वर्ष झालं होतं. मात्र एवढ्या मोठ्या जहाजामधून बाहेर उडी मारणं बावळटपणाचं आणि घाई केल्यासारखं ठरेल असं मला वाटल्याने मी माझी कामगिरी सुधारण्यावर अधिक लक्ष दिलं," असं 'बिझनेस इनसायडर'शी बोलताना राहुलने सांगितलं.
...अन् प्रमोशन मिळालं; कौतुक झालं
राहुल करत असलेल्या प्रयत्नांना यश आलं. कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षांमध्ये त्याने फेसबुकसाठी एक भन्नाट टूल तयार केलं. हे टूल कंपनीमध्ये काम करणाऱ्यांनीही वापरलं. यामुळे इंजीनिअर्सला फार फायदा झाला. त्यांच्या कामाचा वेळ या टूलमध्ये वाचला. या कामगिरीमुळे राहुलला प्रमोशन मिळालं. मूळ वेतनाबरोबर राहुलला 2 कोटी रुपये मुल्याची इक्विटीही मिळाली. इक्विटीची संपूर्ण रक्कम म्हणजेच 2 कोटी रुपये राहुलला मिळाले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुलने रोजगाराचे इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली.
नोकरी सोडली अन् सुरु केलं स्टार्टअप; पण हे स्टार्टअप काय काम करतं?
"माझ्याकडे केवळ टेक्निकल ज्ञान होतं. याच जोरावर मी स्टार्टअपचा विचार केला," असं राहुल सांगतो. राहुलने 2022 साली मेटा सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वत: टारो नावचं स्टार्टअप सुरु केलं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या इंजीनिअर्सला तांत्रिक ज्ञान देण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी मदत करण्यासाठी हे स्टार्टअप काम करणार आहे. राहुलने मेटामध्ये बनवलेल्या टूलमधूनच त्याला ही कल्पना सुचल्याचं सांगितलं जात आहे.