चेन्नई : भारताची पहिलीच इंजिन नसलेली ट्रेन २९ ऑक्टोबरला रुळावर परिक्षणासाठी येणार आहे. ही ट्रेन शताब्दी एक्सप्रेसची जागा घेणार आहे. ही ट्रेन सेल्फ प्रपल्शन मॉड्यूलवर १६० किमी प्रती किमी वेगानं जाऊ शकते. तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे या ट्रेनचा वेग इतर ट्रेनपेक्षा जास्त आहे. ट्रेन १८ असं या ट्रेनचं नाव आहे.


ट्रेनमध्ये १६ डबे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूण १६ डबे असलेली ही ट्रेन शताब्दी ट्रेनपेक्षा कमी वेळ घेईल. या ट्रेनला चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ)मध्ये १८ महिन्यांमध्ये तयार करण्यात आलं. या ट्रेनची प्रतिकृती बनवण्यासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च आला. पण भविष्यात याचं उत्पादन करताना खर्च कमी होईल, अशी माहिती आयसीएफचे महाप्रबंधक सुधांशू मणी यांनी पीटीआयला सांगितलं.


ट्रेनमध्ये २ एक्जिक्यूटिव कंपार्टमेंट


या ट्रेनचं अनावरण २९ ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर तीन ते चार दिवस फॅक्ट्री बाहेर ट्रेनचं परीक्षण होईल. यानंतर रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायजेशन (आरडीएसओ)कडे ही ट्रेन पुढच्या परिक्षणासाठी पाठवण्यात येईल. या ट्रेनच्या मध्ये २ एक्जिक्यूटिव कंपार्टमेंट असतील. प्रत्येकात ५२ जागा असतील. तर सामान्य डब्यात ७८ जागा असतील.


या वेगानं ट्रेन धावणार


शताब्दी ट्रेनचा वेग १३० किमी प्रती तास आहे. तर ही ट्रेन १६० किमी प्रती तासाच्या वेगानं धावेल. जर ट्रेन १८ च्या वेगाप्रमाणे रुळ बनवण्यात आले तर ती शताब्दीपेक्षा १५ टक्के कमी वेळ घेईल. ट्रेन १८ मध्ये जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली, वेगळ्या प्रकारचे लाईट, ऑटोमेटिक दरवाजे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. शताब्दी ट्रेन १९८८ मध्ये सुरु करण्यात आली होती. सध्या ही ट्रेन देशातल्या मेट्रो शहरांना दुसऱ्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या २० रेल्वे मार्गांवर सुरु आहे.