काय आहे हे लोकप्रिय होत असलेलं ‘सराहा’ अॅप ?
सोशल मीडियात आपल्या मित्रांसोबत-नातेवाईकांसोबत संपर्क ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चॅटिंग अॅप वापरले जातात. फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट हे काही प्रमुख अॅप्स जास्त लोकप्रिय आहेत.
नवी दिल्ली : सोशल मीडियात आपल्या मित्रांसोबत-नातेवाईकांसोबत संपर्क ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चॅटिंग अॅप वापरले जातात. फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट हे काही प्रमुख अॅप्स जास्त लोकप्रिय आहेत.
आता सौदी अरबमधील एक मेसेज अॅप्लीकेशन सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. ‘सराहा’(Sarahah) असे या अॅपचे नाव असून याची लोकप्रियता कमालीची वाढत आहे. हे अॅप जगभरता फेसबुक आणि स्नॅपचॅटपेक्षाही जास्त लोकप्रिय असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे की, सराहाचा अर्थ काय? तर सराहाला अरबीमध्ये इमानदार असे म्हटले जाते.
सराहा हे अॅप जगभरात पसंत केलं जात आहे. साधारण एक वर्षाआधी लॉन्च झालेल्या या अॅपला आतापर्यंत ३० कोटींपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे तयार करणारी कंपनी एक स्टार्टअप कंपनी आहे आणि तीन लोक ही कंपनी चालवतात.
या अॅपची वैशिष्ट्ये :
मिडल इस्टमध्ये लोकप्रिय झालेलं हे अॅप आता भारतातही आपला जम बसवत आहे. या अॅपच्या माध्यमातून यूजर्स त्यांच्या प्रोफाईलमधील व्यक्तींना मेसेज पाठवू शकतात. या अॅपची मजेदार गोष्ट म्हणजे मेसेज प्राप्त करणा-या व्यक्तीला हे कळणारच नाही की, मेसेज कुणी पाठवला आहे.
सध्या या अॅपमध्ये मेसेजला रिप्लाय करता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना मेसेज पाठवू शकता. मात्र, ते त्यांना तुमचं नाव कळणार नाही. म्हणजे ज्या लोकांशी तुम्ही समोरासमोर काही बोलू शकणार नाहीत. त्यांच्याशी या अॅपच्या माध्यमातून बोलू शकणार आहात. पण त्यांना तुम्ही कोण आहात हे कळणार नाही.
हे अॅप स्नॅपचॅटसारख लिंक शेअरिंगच्या सेवेमुळे अधिक लोकप्रिय होत आहे. या अॅपचा कुणीही गैरवापर करू नये म्हणून यात ब्लॉकिंग आणि फिल्टरींगचीही व्यवस्था देण्यात आली आहे.
असे करा डाऊनलोड :
सराहा हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून, अॅप स्टोरवरून डाऊनलोड करू शकता. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमच्या मित्रांना यावरून मेसेज पाठवू शकता. सध्या या अॅपमध्ये तुम्ही आलेल्या मेसेजला रिप्लाय करू शकत नाही. मात्र यावर कंपनी काम करत असल्याचं बोललं जात आहे.
या अॅपचे तोटे :
या अॅपमुळे सायबर बुलिंगचा धोका वाढू शकतो. नकारात्मकता जास्त वाढू शकते. दावा केला जात आहे की, या अॅपला फेसबुक आणि स्नॅपचॅटपेक्षाही जास्त पसंती मिळत आहे. मात्र सायबर एक्सपर्टचं म्हणनं आहे की, हे अॅप भारताच्या सुरक्षेवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतं. फेसबुक आणि ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर ट्रोलिंग आणि बुलिंग वाढलं आहे. ट्रोलिंग थांबवण्यासाठी कंपनीकडून उपाययोजना केल्या गेल्या नाहीयेत. ना कोणते कायदे आहेत.