मुंबई : आंतरराष्ट्रीय कंपनीचा तुम्हाला एखादा मेसेज आला किंवा लिंक आली तर तात्काळ सावध व्हा. कोणत्याही लिंकची खातरजमा केल्याशिवाय ती लिंक उघडू नका किंवा क्लिक करु नका. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होण्याचा मोठा धोका आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय कंपनी असल्याचे भासवून मॉन्ट ब्लँक (Mont Blanc) या नावाच्या नकली वेबसाईटने फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात आर्थिक  फसवणुकीच्या अनेक तक्रारी येत आहेत. या नकली वेबसाईटपासून सावध राहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या लॉकडाऊनच्या काळात बरेच सायबर भामटे खोटे मेसेजेस व फेक वेबसाईट बनवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाने सध्या बरेच मेसेजेस आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. 


Mont Blanc या कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर विशेषतः त्यांच्या शाई पेन या उत्पादनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनच्या काळात सूट दिली आहे व सर्वांनी त्यांच्या वेबसाईटवरुन त्यांची उत्पादने  विकत घ्यावीत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, जर तुम्हाला अशा कोणत्या प्रकारचा मेसेज आला व खालील पैकी कोणत्याही वेबसाईटचे नाव त्या मेसजमध्ये दिसल्यास त्यावर क्लिक करु नये. कारण त्या वेबसाईट या सायबर भामट्यांनी लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याकरिता बनविलेल्या फेक वेबसाईट आहेत.


ही आहेत फेक वेबसाईटची नावे


https://montblancsindia.com
https://montblancindias.com


Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीचे अधिकृत विक्रेते हे टाटा क्लिक (Tata Cliq) आहेत व त्यांची वेबसाईट https://luxury.tatacliq.com/अशी आहे. त्यामुळे जर कोणत्याही नागरिकांनी वरीलपैकी कोणत्याही फेक वेबसाईटवर खरेदी केली असेल आणि त्यांना डुप्लिकेट वस्तू किंवा अजून खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी मिळाली नसेल तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार द्यावी तसेच www.cybercrime.gov.in  या वेबसाईटवर देखील त्याची नोंद करावी,असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर विभागच्यावतीने करण्यात आले आहे.