सिम कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणं पडलं महागात, १ लाख १० हजारांचा लागला चूना
सरकारने मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. त्यामुळे सर्वच नागरिक आधार कार्ड आणि सिमकार्ड लिंक करत आहेत. मात्र...
नवी दिल्ली : सरकारने मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. त्यामुळे सर्वच नागरिक आधार कार्ड आणि सिमकार्ड लिंक करत आहेत. मात्र, एका व्यक्तीला आधार-सिम लिंक करणं चांगलचं महागात पडल्याचं वृत्त समोर आलं आहे.
जयपूरमध्ये आधार कार्ड आणि सिम कार्ड लिंक करणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल १ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बापू नगर येथील निवासी एस के ब्रिजवानी यांच्याकडून एका तरुणाने मोबाईल नंबरसोबत आधार कार्ड लिंक करण्यास सांगितलं. याच दरम्यान, या युवकाने ब्रिजवानी यांच्याकडून सिम कार्ड घेतलं आणि नवं सिम कार्ड दिलं.
जुन्या सिम कार्डच्या मदतीने ब्रिजवानी यांच्या अकाऊंटवरुन या युवकाने १,१०,००० रुपये काढून घेतले. ज्यावेळी ब्रिजवानी यांनी घडलेला प्रकार समजला त्यावेळी त्यांनी बँकेत धाव घेत चेक केलं तर खरोखरं असं झाल्याचं समोर आलं.
ब्रिजवानी यांनी आधार-सिम लिंक करण्यासंदर्भात एक कॉल आला होता. यावेळी त्यांना सांगण्यात आलं होतं की, जर आधार-सिम लिंक केलं नाही तर तुमचं सिमकार्ड डिअॅक्टिव्ह होईल. त्यानंतर ब्रिजवानी यांना एक एसएमएस आला त्यामध्ये सिमकार्ड सर्व्हिस सेंटरमध्ये पाठवण्यास सांगण्यात आलं. यानंतर त्यांचं सिमकार्ड बंद झालं आणि बँकेतून पैसेही गायब झाले.
या प्रकरणी ब्रिजवानी यांनी गांधी नगर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.