नवी दिल्ली :  आजकाल बहुतांशी लोक ऑनलाइन शॉपिंग करणे पसंत करतात, यामुळे बाहेर जाऊन वस्तू खरेदी करण्याची मेहनत वाचते आणि काही चांगल्या ऑफर पण मिळतात. पण एका तरुणाला या ऑनलाइन शॉपिंगचा चांगला अनुभव आला नाही. 
 
तरुणाने आपल्या आवडीचा फोन ऑनलाइन मागविला. डिलिवरी घरी आली आणि त्याने बॉक्स उघडल्यावर त्यात मोबाईलच्या ऐवजी कपड्या धुण्याचे साबण मिळाले. हे त्या युवकाने फेसबूकवर पोस्ट केले, त्यानंतर कंपनीने लगेच कारवाई करत त्याला नवीन फोन पाठविण्याचे आश्वासन दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या चिराग धवन याने टाकलेल्या फेसबूक पोस्टनुसार त्याने अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग साइटवरून सात सप्टेंबररोजी एक मोबाईल फोन ऑर्डर केला होता. ११ तारखेला त्याला पॅकेज मिळाले. ऑफीसहून घरी गेल्यावर रात्री त्याने बॉक्स उघडला. तर त्याला धक्काच बसला. त्यात मोबाईल ऐवजी साबणाच्या वड्या होत्या. 


चिरागने हा फोटो लगेच अॅमझॉनला टॅग करून पोस्ट केला. त्यान कंपनीच्या कस्टमर केअर सर्व्हिसवर आपला राग काढला. चिरागने सांगितले, की पाकिटात साबणाच्या वड्या मिळाल्यानंतर त्याने कस्टमर केअरला कॉल केला. पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्याने कम्प्लेंट नंबर विचारला तर त्याला तो देण्यास नकार दिला. पोस्टमध्ये चिरागने या प्रकरणी कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्यांना दखल देण्याची विनंती केली. 


फेसबूकवर करण्यात आलेल्या पोस्टला जबरदस्त रिस्पॉन्स आला. चिरागने पोस्ट केल्यावर ८ हजारपेक्षा अधिक कमेंट आल्या तसेच तीन हजार पेक्षा अधिक जणांनी त्याची पोस्ट शेअर केली. 


मीडियातील बातम्यांनुसार पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने कारवाई केली. त्यांनी चिरागला नवा फोन देण्याचे आश्वासन दिले.