नवी दिल्ली - भारतातील अनेक मध्यमवर्गीयांचे कारचे स्वप्न साकार करणारी मारुती सुझुकीची आल्टो गाडी लवकरच नव्या रुपात ग्राहकांसमोर येणार आहे. ही गाडी सुरू झाल्यापासून आजतागायत त्याची मागणी कायम असून, अनेक जण आपली पहिली चारचाकी गाडी म्हणून आल्टो ८०० याच गाडीला प्राधान्य देतात. ही गाडी आता अधिक सुंदर रुपात ग्राहकांसमोर येत आहे. एक एप्रिल २०२० पासून देशात क्रेश टेस्ट अनुरूप गाड्यांची निर्मिती बंधनकारक होणार आहे. त्यामुळेच आल्टो ८०० गाडीला नवा लूक देण्यात येत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार येत्या दिवाळीमध्ये मारुती सुझुकीकडून नव्या रुपातील गाडी बाजारात सादर केली जाईल. मारुतीने नुकतीच नव्या रुपातील वॅगन आर बाजारात सादर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८ मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुतीने आल्टोचा नवा लूक सादर केला होता. सध्याची आल्टो गाडी हॅचबॅक श्रेणीतील आहे. पण नव्या रुपातील आल्टो गाडी SUV सारखी असेल. मिनी SUV असे या नव्या लूकचे वैशिष्ट्य असेल. नव्या आल्टोमध्ये टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम असेल. त्याचबरोबर डिजिटल इन्स्ट्रूमेंट कन्सोल, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल त्याचबरोबर बसण्यासाठी पुढे आणि मागे अधिक जागा असेल. आल्टो ८०० गाडीची स्पर्धा ह्युंदाईची सॅंट्रो, रिलॉन्सची क्वीड आणि टाटाच्या टियागोशी असेल. आल्टोचे इंजिनही बीएस६ मानांकनानुसार असेल, असे समजते. पण कंपनीकडून अधिकृतपणे यावर काहीही टिप्पणी करण्यात आलेली नाही. सध्याचे आल्टोचे इंजिन ८०० सीसी आणि एक लिटर या प्रकारात आहे.


नव्या रुपातील आल्टो गाडीची किंमत काय असेल, हे सुद्धा अजून निश्चित नाही. सलग चार महिने मारुती आल्टोची विक्री उच्चांकी स्तरावर असताना नोव्हेंबर २०१८ त्यामध्ये घट झाली होती. एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ या काळात मारुतीने आल्टोच्या १, ६९, ३४३ गाड्या विकल्या होत्या.