मुंबई : देशातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं बुधवारी अर्टिगाचं नवीन व्हेरिएंट लॉन्च केलं. या नव्या व्हेरिएंटची किंमत ७.४४ लाख रुपये ते १०.९ लाख रुपये आहे. गाडीच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ७.४४ लाख ते ९.९५ लाख रुपये आहे. तर डिझेल व्हेरिएंटची किंमत ८.८४ लाख ते १०.९ लाख रुपये आहे. अर्टिगाच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत जुन्या मॉडेलपेक्षा ७१ हजार रुपयांनी जास्त आहे. तर डिझेल मॉडेलची किंमत २० हजारांनी जास्त आहे.


मारुतीकडून ४.२ लाख अर्टिगाची विक्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुती अर्टिगाचं हे मॉडेल होंडा सीआरव्ही, महिंद्र मजारो यांच्याशी स्पर्धा करेल. सगळ्यात पहिले २०१२ साली भारतीय बाजारात अर्टिगा आली होती. आत्तापर्यंत कंपनीनं ४.२ लाख अर्टिगाची विक्री केली आहे. कंपनीनं अर्टिगाचे १० व्हेरिएंट बाजारात आणले आहेत.



आधीपेक्षा जास्त जागा


नवीन अर्टिगाला मारुतीनं हरटेक्ट प्लॅटफॉर्मवर तयार केलं आहे. नवीन गाडीमध्ये पहिलेपेक्षा जास्त जागा देण्यात आली आहे. गाडीची लांबी ४,३९५ एमएम, रुंदी १,७३५ एमएम आणि उंची १,६९० एमएम आहे. गाडीचा व्हीलबेस २,७४० एमएम आहे. नवीन एर्टिगामध्ये ४५ लीटरचा फ्युअल टँक देण्यात आलाय. गाडीच्या इंटिरियरला वूड फिनिश देऊन प्रिमियम लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.


गाडीला १.५ लीटरचं पेट्रोल इंजिन


नवीन अर्टिगामध्ये मारुतीनं सेडान सियाजला असलेलं १.५ लीटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन ६ हजार आरपीएमवर १०५ एचपी ची पावर आणि ४,४०० आरपीएमवर १३८ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. गाडीच्या डिझेल व्हेरिएंटमध्ये १.३ लीटरचं डिझेल इंजिन आहे. जे ४.४०० आरपीएमवर ९० एचपीची पावर आणि १,७५० आरपीएमवर २०० न्यूटन मीटरचं टॉर्क जनरेट करतं. पेट्रोल आणि डिझेल इंजिनला एसएचव्हीएस हायब्रिड टेक्नोलॉजी वापरून तयार केलं आहे.



नवीन टेक्नोलॉजी वापरल्यामुळे ही गाडी चांगलं मायलेज देईल असा दावा कंपनीनं केला आहे. अर्टिगा Z+व्हेरिएंटमध्ये मारुतीची स्मार्टप्ले इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. गाडीमध्ये कॅमेरासोबतच रियर पार्किंग सेंसर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, १५ इंचांचं एलॉय व्हील, स्टियरिंग व्हीलवर लेदर फिनीश आणि हाईट ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट देण्यात आली आहे.