`हे` आहेत व्हॉट्सअपचे नवे फिचर्स आणि स्टिकर्स
काही नवे आणि अफलातून फिचर्स युजर्सच्या भेटीला.
मुंबई : जगभरात जवळपास अनेकांच्याच वापरात असणाऱ्या व्हॉट्सअप या मेसेजिंग अॅपची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच आहे. अनेक प्रतिस्पर्धी अॅप असतानाही व्हॉट्सअपच्या लोकप्रियतेत तसूभरही कमी झालेली नाही. असं हे अॅप आता लवकरच काही नवे आणि अफलातून फिचर्स त्यांच्या युजर्ससाठी आणणार असल्याचं कळत आहे.
काही दिवसांपूर्वी फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या मेसेजवर तसं लिहून येण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे तो मेसेज फॉरवर्ड झालेला आहे की खरंच कोणी तो टाईप करुन पाठवलेला आहे हे स्पष्ट होत होतं.
अनोखं फिचर यशस्वी झाल्यानंतर आता जिओ फोन वापरणाऱ्यांनाही व्हॉट्सअपची सुविधा मिळणार आहे.
व्हॉट्सअपच्या मेसेजिंग मोडमध्येही दोन नव्या फिचर्सवर काम सुरु असून, त्यामध्ये 'स्वाईप टू रिप्लाय' आणि 'डार्क मोड' अशी नवी तंत्र असल्याचं कळत आहे.
'स्वाईप टू रिप्लाय'च्या माध्यमातून अमुक एका मेसेजला रिप्लाय देण्यासाठी आता त्या नावावर क्लिक करण्याऐवजी ते उजव्या बाजूला स्वाईप केलं तरीही रिप्लाय देणं शक्य होणार आहे. iOs युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध असून लवकरच ते अँड्रॉईड युजर्सनाही वापरता येणार आहे.
रात्रीच्या वेळी डोळ्यांना मोबईलच्या प्रकाशामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी म्हणून 'डार्क मोड' हे फिचर आणण्यात आलं आहे. WABetaInfo (@WABetaInfo) या ट्विटर अकाऊंटवरुन या फिचर्सवर व्हॉट्सअपकडून काम सुरु असल्याचं म्हटलं गेलं.
नव्या फिचर्ससोबतच हे अॅप वापरणाऱ्य़ांसाठी काही नवे स्टिकर्सही व्हॉट्सअप लवरकच आणणार असल्याचं या ट्विटर अकाऊंटवरुन सांगण्यात आलं आहे. तेव्हा आता या नव्या फिचर्स आणि स्टिकर्सना व्हॉट्सअप वापरणाऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.