भारतात लाँच होणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! आकर्षक लूकसह जबरदस्त फीचर्स
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे कारप्रेमींचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे आहे. ग्राहकांची मागणी पाहता ऑटो कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करण्यावर जोर देत आहेत.
मुंबई: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे कारप्रेमींचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे आहे. ग्राहकांची मागणी पाहता ऑटो कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करण्यावर जोर देत आहेत. त्यात केंद्र आणि राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अनुदानही जाहीर केलं आहे. असं असलं तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती खिशाला परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे स्वस्त इलेक्ट्रिक कार कधी येणार? या प्रतीक्षेत ग्राहक आहेत. एमजी मोटर इंडिया देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करते. मीडिया रिपोर्टनुसार एमजी मोटर कंपनी स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे. या गाड्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या असतील, असं सांगण्यात येत आहे. ही इलेक्ट्रिक कार आकाराने लहान शकते. तसेच या कारचे सांकेतिक नाव MG E230 आहे.
एमजीची ही नवीन इलेक्ट्रिक कार आकाराने खूपच लहान असेल. या गाडीला फक्त दोन दरवाजे असतील आणि 4 लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. कंपनी पुढील वर्षी भारतात ही गाडी लाँच करु शकते. या गाडीची लांबी 2,197 मिमी, रुंदी 1,493 मिमी आणि उंची 1,621 मिमी असेल. तर व्हीलबेस 1,940 मिमी असेल. एकंदरीत ही कार आकाराने मारुती अल्टो इतकी मोठी असेल. या कारला चिनी बाजारपेठेत खूप पसंती मिळत आहे. भारतीय ग्राहकांचं बजेट लक्षात घेऊन कंपनी ही गाडी भारतात लाँच करण्याचा विचार करत आहे.
नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये एबीएससह EBD, पार्किंग सेन्सर्स आणि पुढच्या बाजूला ड्युअल एअरबॅगसह असेल. याशिवाय कारला कनेक्टेड कार तंत्रज्ञानही मिळू शकते. यात 20 kW-R बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे. कारला एका चार्जवर 150 किमी पर्यंतची रेंज देईल. नवीन MG EV ची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असून ग्राहकांच्या बजेटमध्ये असेल, असं सांगितलं जातं. टाटा टीगोर सध्या भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत रु. 11.99 लाख आहे.