सुरुवातीला इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; अल्पवयीन मुलीने 50 तरुणांना लुटले
Delhi Crime News: या टोळीत सामील असलेल्या मुली प्रोफेशनल फोटोग्राफरकडून फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होत्या.
Delhi Crime News: सोशल मीडिया आणि सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. फेक अकाउंट तयार करुन पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. दिल्लीत असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला आहे.
एक मुलगी पहिले इन्स्टाग्रामवर इतरांशी मैत्री करायची आणि पुन्हा त्यांनाच ब्लॅकमेल करायची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी शुक्रवारी या टोळीचा म्होरक्या असलेल्या अल्पवयीन मुलीला अटक केली आहे. बुध विहार येथे राहणाऱ्या एका युवकाने 12 फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. आत्तापर्यंत या टोळीने जवळपास 50 तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, तरुणीने बनावट इन्स्टाग्राम प्रोफाइल बनवून त्यामाध्यमातून युवकांसोबत संपर्क साधत होती. सुरुवातीला ती तरुणाचे फोटो लाइक आणि कमेंट करुन मैत्री वाढवायची. ओळख झाल्यानंतर ती स्वतःला सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याचे सांगत युवकांकडून बिझनेस आणि त्यांच्या कमाईबाबत विचारत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने पीडित तरुणीला भेटण्यासाठी बोलवले होते. तिने तिच्या आईला सोन्याची चेन द्यायची आहे असं सांगून त्याला भेटायला बोलवले. 10 फेब्रुवारी रोजी तिने सिग्नेचर पुलावर त्याला भेटण्यासाठी बोलवले. सुरुवातील युवकाने तिला भेटण्यास नकार दिला मात्र तिने हट्ट करुन त्याला भेटण्यासाठी बोलवले. जेव्हा पीडित तिला भेटण्यासाठी गेला तेव्हा ती तिच्या एका मैत्रीणीसह आली होती आणि त्याला तिच्या फ्लॅटवर चलण्याचा आग्रह केला.
फ्लॅटवर पोहोचताच युवकासोबत मारहाण
पीडित युवकाने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तो फ्लॅटवर पोहोचताच पीडित मुलीने त्याच्याकडून सोन्याची चेन घेतली आणि तीन मुलदेखील तिथे पोहोचले होते. तिन्ही मुलांनी पीडित तरुणाला बेदम मारहाण केली. त्यावेळी मोठ्याने गाणीलावण्यात आली जेणेकरुन आवाज बाहेर जाऊ नये.
मीडिया रिपोर्टनुसार, पीडित युवकाचे कपडे काढून त्याच्यासोबत गैरव्यवहार करण्यात आले आणि त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला. तर, एका तरुणीने व्हिडिओ बनवून त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. आरोपींनी त्याच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, पीडित तरुणाकडे फक्त 1 लाख रुपयेच होते. आरोपी तरुणीने त्याच्या एटीएममधून 1 लाख रुपये काढून घेतले.
आरोपींनी साधारण मध्यरात्री 3 वाजता पीडित युवकाला सोडले. पण त्याआधी त्याच्या फोनमधून इन्स्टाग्राम चॅट, व्हॉट्सअॅप लोकेशन आणि इतर सर्व पुरावे डिलिट केले. पोलिसांनी अल्पवयीन तरुणीला अटक केली आहे आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी तरुणीचा फोन जप्त केला आहे. तिच्या फोनमध्ये तब्बल 50 जणांचे व्हिडिओ मिळाले आहेत.