TikTokला टक्कर देतंय भारतीय `Mitron App`; आतापर्यंत 50 लाखहून अधिक वेळा डाऊनलोड
आयआयटीच्या एका विद्यार्थ्याने `Mitron App` तयार केलं आहे.
नवी दिल्ली : गेल्या कित्येक दिवसांपासून 'टिकटॉक' ऍप चांगलंच चर्चेत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला जात असल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत, शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म 'टिकटॉक'चं रेटिंग गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट यूजर्सनी कमी केलं आहे. 'टिकटॉक' ऍप बॅन करण्याचीही मागणी यूजर्सकडून होत आहे. यादरम्यानच 'Mitron' नावाचं एक भारतीय ऍप TikTokला टक्कर देत आहे. 'Mitron' ऍप आतापर्यंत 50 लाखहून अधिकवेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे.
जवळपास एक महिन्यापूर्वी रिलीज झालेले हे ऍप त्याच्या नावामुळे नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होत आहे. 'टिकटॉक'प्रमाणे फिचर्स असलेलं 'Mitron' ऍप आयआयटी, रुडकीच्या शिवांक अग्रवाल या विद्यार्थ्याने तयार केलं आहे. 11 एप्रिल 2020मध्ये हे ऍप लॉन्च करण्यात आलं. सध्या 'Mitron' ऍप केवळ ऍन्ड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध आहे. पेटीएमचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक यांनी केलेल्या ट्विटमध्ये, गुगल प्ले स्टोरवर हे ऍप टॉप फ्री चार्टमध्ये दुसर्या स्थानावर असल्याचं दिसत आहे.
ऍप रिलीज झाल्यानंतरही यात अनेक समस्या आहेत. तरीही या ऍपला सकारात्मक यूजर्स रिव्ह्यू आणि रेटिंग्स मिळाले आहेत. जवळपास 4.7 रेटिंग्स मिळालेल्या ऍपला अनेकांनी लॉग-इन करताना, ऑडिओबाबत समस्या येत असल्याचं सांगितलं. मात्र हे ऍप इंडियन प्लॅटफॉर्मवरील असल्याने यूजर्सकडून या ऍपला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.