नवी दिल्ली : केवळ मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्हाला आता अवघ्या काही मिनिटांतच कर्ज मिळू शकतं. स्टार्टअप कंपनी मनीटॅपने मोबाईल अॅपच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी एकूण ३०० कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे सह संस्थापक अनुज ककर यांनी सांगितले की, हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी लहान शहरांकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यामुळेच मनीटॅपचं अॅप हे हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. लवकरच हे अॅप तेलुगू, तमिळ, मराठी आणि गुजराती भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


अनुज ककर यांनी म्हटलं की, सध्या १४ शहरांत ही सेवा देण्यात येत आहे आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत ५० शहरांत ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. मनीटॅप मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना तात्काळ, काही मिनिटांतच कर्ज मंजूर होणार आहे. हे कर्ज नागरिक तीन वर्षांपर्यंत आपल्या सुविधेनुसार वापरू शकतात. कंपनीने या सुविधेसाठी सिबिल आणि बँकांसोबत हातमिळवणी केली आहे.


एका अॅपच्या माध्यमातून कुठलाही व्यक्ती बँकेतून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतो. हे पहिलं आणि खास स्टार्टअप आहे ज्याच्या माध्यमातून काही मिनिटांतच नागरिकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या कर्जासाठी कुठल्याही प्रकारचं डिपॉझिटची गरज नाहीये. मनीटॅपने सध्या कर्ज देण्यासाठी आरबीएल बँकेसोबत हातमिळवणी केली आहे आणि येत्या काळात आणखीन बँकांसोबत ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.


२०,००० रुपयांपेक्षा अधिक मासिक उत्पन्न असलेल्या वेतनधारकांना आणि स्वयंरोजगार असलेल्या युवकांना ३,००० रुपयांपासून पाच लाखांपर्यंतचं कर्ज देण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम मनीटॅप अॅपमध्ये येते आणि ही रक्कम तुम्ही कधीही आपल्या बँक अकाऊंटवर ट्रान्सफर करु शकता. तसेच आरबीएल बँकेचं को-ब्रँडेड क्रेडीट कार्डही उपलब्ध आहे.