प्रल्हाद शिंदेंचा पहाडी आवाज इंटरनेट युगातही लोकप्रिय
पहाडी आवाज असलेले महाराष्ट्राचे गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातलं गाणं यूट्यूबवर भारतात नंबर १ वर ट्रेन्ड होतं आहे.
जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : पहाडी आवाज असलेले महाराष्ट्राचे गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातलं गाणं यूट्यूबवर भारतात नंबर १ वर ट्रेन्ड होतं आहे. एवढंच नाही तर या गाण्याचे बोल आहेत, 'पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा'. प्रल्हाद शिंदे यांचं हे एकच गाणं नाही तर अशी अनेक गाणी आहेत, की जे कानावर आजही पडली तर समाधान देतात, आनंद देतात.
तो पहाडी आवाज नव्या पिढीच्या कानातही दुमदुमला
प्रल्हाद भगवानराव शिंदे हे गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचे वडिल आणि युवा गायक आदर्श शिंदे यांचे आजोबा. आजही या पहाडी आवाजाला त्या त्या क्षणी, सणाला ऐकण्यासाठी प्रेक्षकांचे कान आसुसलेले असतात.
फेसबूक, गूगलच्या पिढीलाही आकर्षण
गणेशोत्सवाचा उत्साह मुंबईसह महाराष्ट्रात तसेच जगभरात अनेक ठिकाणी ओसांडून वाहत आहे. इंटरनेटवर गणेशोत्सवाच्या गाण्याची धूम आहे. तुम्ही लहाणपणी ऐकलेली गणपतीची गाणी, नवीन पिढीसाठी कधीच जुनी झाली नाहीत, खास करून इंटरनेटच्या पिढीसोबत वाढणाऱ्या तरूणांसाठी तर नक्कीच नाही, हे तुम्हाला ही गाणी ऐकून नक्की लक्षात येईल.
गणेशोत्सवात मराठी गाणं ट्रेन्ड
लोकांमध्ये आजही गणेशोत्सवात बॉलीवूडपेक्षा हीच मराठी गाणी जास्त लोकप्रिय आहेत, याचा हा पुरावा असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांना ही मराठी गाणी ऐकायला आवडतात, हे स्पष्ट होतं.
पहाडी आवाज क्रांतीची प्रेरणा देणारा
प्रल्हाद शिंदे यांचा पहाडी, पण गोड आवाज दलित चळवळीतही क्रांतीची प्रेरणा देणाराही ठरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यावरील त्यांची अनेक गाणी लोकप्रिय होती, त्यात 'भीमराया तुझी साथ होती' हे गाणं अप्रतिम आहे. या गाण्यासारखं गाणं आजही दलित चळवळीत आलं नाही असे काही अनुयायी म्हणतात. दुसरीकडे 'ऐका सत्य नारायणाची कथा' हे गाणंही आजही कानावर पडलं, तर पुन्हा प्रल्हाद शिंदेची आठवण होती.
प्रल्हाद यांची गीतभक्ती
गायक प्रल्हाद शिंदे यांचं दलित चळवळीत बाबासाहेब आंबेडकरांसाठी 'भीमराया तुझी साथ होती' हे गाणं आजही लोकप्रिय आहे. तर दुसरीकडे पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होणाऱ्या वारकऱ्यांसाठी, 'पाऊले चालती पंढरीची वाट', आणि गणपतीसाठी 'पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा' हे गाणं विशेष लोकप्रिय आहे, एवढंच नाही तर आईवडिलांसाठी सेवाची प्रेरणा देणारं आणि महाराष्ट्रातील सर्वच संतांची महती सांगणारं 'दर्शन दे रे, दे रे भगवंता', आजही भक्ती प्रेरणा देते.