रशियाला आणखी एक तगडा झटका! Google ने Android च्या सेवा थांबवल्या
Russia Ukraine war | google update | Android user | सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गुगलने रशियाला आणखी एक झटका दिला आहे. अँड्रॉईड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अनेक सेवा बंद केल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
नवी दिल्ली : गेल्या अठरा दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. रशियाच्या या हल्ल्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला हादरे बसत आहे. अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि मोठ्या कंपन्यांनी रशियातील त्यांच्या अनेक सेवांवरही बंदी घातली आहे. गुगलनेही रशियावर निर्बंध घालत अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला आहे.
गुगलने रशियाला दिला मोठा धक्का
आपल्या अधिकृत निवेदनात, Google ने म्हटले आहे की, पेमेंट सिस्टममधील व्यत्ययांमुळे, Google Play ने रशियन वापरकर्त्यांसाठी आपली बिलिंग प्रणाली तात्पुरती थांबवली आहे. Google ने स्पष्ट केले की, रशियामधील Android वापरकर्ते अॅप्स आणि गेम खरेदी करू शकणार नाहीत आणि सदस्यता पेमेंट करू शकणार नाहीत.
तसेच, रशियामधील वापरकर्ते Google Play Store च्या मदतीने डिजिटल वस्तूंची अॅप-मधील खरेदी करू शकणार नाहीत. परंतू वापरकर्त्यांना मोफत अॅप्स अजूनही उपलब्ध असतील.
आपल्या घोषणेमध्ये, Google ने असेही म्हटले आहे की ज्या वापरकर्त्यांनी आधीच Google Play Store द्वारे सदस्यता घेतली आहे, त्यांच्या सदस्यतांचे नूतनीकरण केले जाणार नाही आणि ते रद्दही केले जातील.
जर रशियन Android वापरकर्त्यांनी एक महिना किंवा वर्षभर सदस्यता घेतली असेल, तर त्यांना वर्तमान बिलिंग कालावधी पूर्ण करण्याची संधी दिली जाईल.
पुढील बदलणाऱ्या परिस्थितीनुसार वापरकर्त्यांनी गुगलकडून देण्यात येणाऱ्या अपडेटकडे लक्ष ठेवायला हवे.