कर्मचाऱ्यांना घाबरली Microsoft! आठवड्याभरात तो पुन्हा CEO पदावर; नडेलांची मध्यस्थी
Sam Altman To Return As OpenAI CEO: ओपन एआयचे माजी अध्यक्ष जॉर्ज ब्रोकमन यांना बोर्डावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर सॅम अल्टमन यांना पदावरुन हटवल्यानंतर जॉर्ज यांनीही राजीनामा दिला होता.
Sam Altman To Return As OpenAI CEO: ओपन एआय ही कंपनी सध्या केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नाही तर जगभरातील कॉर्परेट क्षेत्रात चर्चेत आहे. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील चेहरे सातत्याने बदलले जात असल्याने कंपनी चर्चेत आहे. मागील आठवड्यामध्ये सॅम अल्टमन यांना कंपनीच्या सीईओ पदावरुन हटवण्यात आलं. कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाने अचानक हा निर्णय़ घेतला आणि गुगल मीटवर सॅम अल्टमन यांना ही महिती दिली. सॅम अल्टमन यांना हटवण्यात आल्यानंतर ओपन एआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रोकमन यांनीही राजीनामा दिला आहे.
कंपनीने मागे घेतला निर्णय
मात्र तडकाफडकी गच्छंती झाल्यानंतर आठवड्याभरात सॅम अल्टमन यांना पुन्हा ओपन एआय कंपनीमध्ये समाविष्ट करुन घेतलं जाणार आहे. कंपनीने एक्सवरुन (ट्वीटरवरुन) ही महिती दिली आहे. सॅम अल्टमन यांना हटवण्यात आल्यानंतर ओपन एआयमधून अनेक कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत होते. मात्र त्याआधीच कंपनीने आपला वादग्रस्त निर्णय मागे घेतला आहे.
कंपनीने काय म्हटलं आहे?
कंपनी नव्या डायरेक्टर बोर्डाच्या सहमतीने ओपन एआयच्या सीईओ पदासाठी सॅम अल्टमन यांची नियुक्ती करण्यासंदर्भात कराराबद्दलची वाटाघाटी करत आहे. या बोर्डाचे अध्यक्ष बर्ट टेलर असून यात लॅरी समर्स आणि अॅडम अँजलो यांचा समावेश आहे. आम्ही इतर माहिती लवकरच जाहीर करु असं ओपन एआय कंपनीने स्पष्ट केलं आहे.
नवी जबाबदारी सोपवली
या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी, 20 नोव्हेंबर 2023 रोजी मायक्रोसॉफ्टने सॅम अल्टमन यांना पदावर नियुक्त करण्याची माहिती दिली. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी एक्सवरुन ही महिती शेअर केली होती. नडेला यांनी एमेट शियर हे ओपन एआयचे नवीन बॉस असतील असं जाहीर केलं. तर सॅम अल्टमन आणि जॉर्ड ब्रोकमन हे दोघेही मायक्रोसॉफ्टच्या नव्या अॅडव्हान्स एआय टीमचं नेतृत्व करतील असंही जाहीर करण्यात आलेलं. नडेला यांनी नव्या निर्णयासंदर्भातील माहिती एक्स अकाऊंटवरुन दिली आहे.
कर्मचाऱ्यांचा राजीनामास्त्र
सॅम अल्टमन यांना कंपनीने डच्चू दिल्यानंतर त्यांच्या पाठीशी कंपनीचे कर्मचारी आणि गुंतवणूकदार उभे राहिले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांनाही सॅम अल्टमन यांना पुन्हा कंपनीत घ्यावे अशी मागणी केली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात दंड थोपटले होते. अनेक कर्मचाऱ्यांनी तर राजीनामाही दिला होता. सॅम यांना बोर्डावरुन हाटवण्यात आलं नव्हतं.
बोर्डावरुन हटवलं अन्..
ओपन एआयचे माजी अध्यक्ष जॉर्ज ब्रोकमन यांना बोर्डावरुन हटवण्यात आलं होतं. यासंदर्भातील माहिती जॉर्ज यांनीच दिली होती. सॅम अल्टमन यांना हटवण्यात आल्यानंतरही जॉर्ज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र जॉर्ज यांना अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं नव्हतं.