नवी दिल्ली: स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत असतात. सध्या भारतीय बाजारात शाओमी हा सर्वात जास्त खप होणारा स्मार्टफोन ठरला आहे. शाओमीच्या स्मार्टफोनमधील फिचर्सना ग्राहकांची मोठी पसंती आहे. शाओमीच्या स्मार्टफोनची किंमत कमी असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात शाओमीचा स्मार्टफोन खरेदी करताना दिसताहेत. भारतात आपली ओळख निर्माण करणारी कंपनी सॅमसंगने चीनची कंपनी शाओमीला टक्कर देण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी सॅमसंग कंपनी एम- सीरीजमधील एम-१० आणि एम-२० या दोन स्मार्टफोनचे अनावरण करणार आहे.  सॅमसंग एम-१० स्मार्टफोनची किंमत ९ हजार ५०० रुपये असणार आहे, तर एम-२० स्मार्टफोनची किंमत १५ हजार रुपये असणार आहे. 


काउंटर पॉईंट रिसर्चचे संचालक नील शाह यांनी सागितले की, सॅमसंगने या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले, कॅमेरा, मेमरी, आणि कनेक्टिव्हिटी टेक्नोलॉजीला चांगल्या पद्धतीने तयार केले आहे. एम- सीरीजचे स्मार्टफोन जागतिक स्तरावर शाओमीपेक्षा अधिक पसंती मिळतील, असे दर्शवण्यात येत आहे. शाह म्हणाले की, जर या स्मार्टफोनचे डिझाइन, कॅमेरा, तसेच इतर स्पेसिफिकेशन ग्राहकांसमोर सादर केले. तर शाओमीच्या विक्रीत घट होऊ शकते. शाह म्हणाले की, ऑफलाइन बाजारात सॅमसंग कंपनीची स्थिती अजूनही दणकट आहे. याचे कारण सॅमसंग कंपनीचे सर्व्हिस नेटवर्क मजबूत आहे. शाओमी कंपनी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये मोठ्या प्रमाणात सूट देऊन ग्राहकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. सायबर मीडिया रिसर्चनुसार, सॅमसंग एम-सीरीजमधील स्मार्टफोनची किंमत शाओमी कंपनीच्या विक्रीत अडचण निर्माण करु शकते.