दुमडता येणारा सॅमसंगचा `गॅलक्सी फोल्ड`, पाहा फिचर्स आणि किंमत
जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असा नावलौकीक मिळवलेला सॅमसंग गॅलक्सी फोल्ड १ ऑक्टोबर रोजी भारतात दाखल होऊ शकतो
नवी दिल्ली : दुमडता येणारा स्मार्टफोन आता लवकरच तुमच्या हातात येऊ शकतो. जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असा नावलौकीक मिळवलेला सॅमसंग गॅलक्सी फोल्ड १ ऑक्टोबर रोजी भारतात दाखल होऊ शकतो. भारतीय ग्राहकही या स्मार्टफोनची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. काही तांत्रिक कारणामुळे झालेल्या उशिरानंतर २७ सप्टेंबर रोजी अमेरिकेत या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे. त्यानंतर लगेचच तो भारतीय ग्राहकांसाठीही उपलब्ध होईल.
सॅमसंगनं हा स्मार्टफोन पहिल्यांदा याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात ग्राहकांसमोर आणला होता. परंतु, एप्रिल महिन्यात होणाऱ्या लॉन्चिंगपूर्वीच या फोनच्या फोल्डेबल स्क्रीनमध्ये काही तांत्रिकदृष्ट्या त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे कंपनीनं या स्मार्टफोनचं लॉन्चिंग पुढे ढकललं.
परंतु, आता मात्र हा स्मार्टफोन आता लवकरच फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, यूके आणि अमेरिकेतही उपलब्ध होणार आहे. भारतात फेस्टिव्ह सीझनमध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यात हा फोन दाखल होण्याची चिन्हं आहेत. हा फोन कॉसमॉस ब्लॅक आणि स्पेस सिल्वर रंगात विक्रीसाठी उपलब्ध असेल.
गॅलक्सी फोल्डचे फिचर्स
- या स्मार्टफोनमध्ये ७.३ इंच इन्फिनिटी फ्लेक्स डायनामिक AMOLED डिस्प्ले आहे
- यात आणखीन एक ४.६ इंचाचा एचडी + सुपर AMOLED डिस्प्लेदेखील आहे
- कव्हरवर १० मेगापिक्सलचा एक सेल्फी कॅमेराही आहे. तर इनर फ्लेक्झिबल स्क्रीनवर १० मेगापिक्सल + ८ मेगापिक्सलचा ड्युएल कॅमेरा सेटअप आहे.
- मागच्या बाजूला १२ मेगापिक्सल + १६ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सल असा रिअर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
- गॅलक्सी फोल्डमध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल मेमरी असू शकेल.
- या स्मार्टफोनमध्ये ४३८० मेगाहर्टझची बॅटरी आहे.
- या स्मार्टफोनची किंमत अमेरिकेत १९८० डॉलर आहे... याच हिशोबानं भारतात या फोनची किंमत जवळपास १ लाख ४० हजारांपर्यंत जाऊ शकेल.