Samsung Galaxy Ring: टेक विश्वात दिवसेंदिवस मोठमोठे बदल घडत आहेत. प्रत्येक कंपन्या तंत्रज्ञानातील नवा अविष्कार घेऊन बाजारात उतरत आहेत. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक नव्या टेक गॅजेटसोबत नवी टेक्नोलॉजी हाताळायला मिळत आहे. आतापर्यंत अ‍ॅपल कंपनी आपले नाविण्यपूर्ण प्रोडक्ट बाजारात उतरवून सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आली आहे. या स्पर्धेत सॅमसंगदेखील कुठे मागे राहिली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंग पुढील वर्षात 'गॅलेक्सी रिंग' नावाची स्मार्ट रिंग लॉन्च करेल अशी शक्यता आहे. GizmoChina ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. स्मार्ट रिंगच्या निर्मितीबाबत सॅमसंग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणार आहे. आपले यश सुनिश्चित करण्याचा प्रयत्न सॅमसंगकडून केला जात आहे. गॅलेक्सी रिंग टीमचे सदस्य यात आपले सहयोग देत आहेत. त्यामुळे सॅमसंगकडून पुढील महिन्यात निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली. 


सॅमसंग स्मार्ट रिंगच्या अनेक वैशिष्ट्यांबद्दल आता चर्चा होऊ लागली आहे. बिल्ड-इन सेन्सर्सद्वारे शरीर आणि आरोग्याचा डेटा संकलित करण्याची क्षमता यामध्ये आहे. त्यामुळे तब्येतीची काळजी घेणाऱ्यांसाठी हे वरदान ठरणार आहे. ही स्मार्ट रिंग स्मार्टफोनला कनेक्ट होऊन शरीराबद्दलची अपडेट देऊ शकते. 


यूजर्सच्या बोटांच्या आकारानुसार अंगठी तयार केली जाईल. यामध्ये अचूकता आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ज्यामुळे सैल फिटिंगमुळे होणारी कोणतीही संभाव्य डेटा त्रुटी कमी होते. अशा अनेक संभाव्य त्रुटींवर डेव्हलपर्सना काम करावे लागणार आहे. 


कमजोर रक्त प्रवाह किंवा जास्त घट्ट फिटिंग ही डेटाच्या अचूकतेवर परिणाम करू शकते. सॅमसंग स्मार्ट रिंगचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाणार आहे. असे असले तरीही हे वैद्यकीय उपकरण स्थितीसाठी प्रमाणन प्रक्रियेस 10 ते 12 महिने लागतील. ज्यामुळे उत्पादन उपलब्ध होण्यास विलंब होऊ शकतो,अशी माहिती सुत्रांनी दिली. 


'कॅमेरे आणि सेन्सर्सचा वापर करून यूजर्सच्या डोक्याच्या आणि हाताच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी सॅमसंग XR डिव्हाइससह 'गॅलेक्सी रिंग'आणण्याचे प्लानिंग सुरु आहे, असे अहवालात म्हटले आहे. 


दरम्यान सॅमसंग हेल्थ बीटा अ‍ॅप, आवृत्ती 6.24.1.023 मध्ये "रिंग सपोर्ट" चा उल्लेख असलेली "वैशिष्ट्य सूची" समाविष्ट असल्याचे या महिन्याच्या सुरुवातीला एका Reddit वापरकर्त्याला असे आढळले. 


हेल्थ बीटा अ‍ॅपमध्ये 'रिंग सपोर्ट' जोडले जाण्याची शक्यता आहे. कारण टेक जायंट इतर कंपन्यांनी बनवलेल्या स्मार्ट रिंगसाठी सपोर्टचा विचार करीत आहे. 


कदाचित कंपनी गॅलेक्सी रिंग रिलीझ करण्याची आणि हेल्थ प्लॅटफॉर्मवर थर्ड पार्टीच्या रिंगसाठी सपोर्ट मिळेल असे प्लानिंग करत आहे.