तुमच्या 7/12 चा सॅटेलाईट बॉडीगार्ड, शेजाऱ्याने शेत खाल्लं तर पकडली जाणार चोरी
आता Satellite करणार तुमच्या जमिनीची राखण, राज्यातील दोन तालुक्यातील दहा गावात उपक्रमाला सुरुवात
अरूण मेहेत्रे, झी मीडिया पुणे : शेतजमीन विकत घेताना पूर्ण जमीन ताब्यात आलीय का? सातबारा उताऱ्यानुसार ती शाबूत आणि जागेवरच आहे का? तुमचा शेताचा बांध कुणी कोरलाय का? अशा प्रश्नांना आता नेमकं उत्तर मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाने यावर तोडगा काढलाय. सातबारा उताऱ्याला उपग्रहाद्वारे (Satellite) काढलेल्या नकाशाची जोडणी करून जमिनीची अचूक मोजणी होणार आहे. राज्यातील बारामती (Baramati) आणि खुलताबाद (Khultabad) या दोन तालुक्यांतील प्रत्येकी दहा गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झालीय. पुढच्या दोन वर्षांत हा उपक्रम राज्यभरात राबवण्याचा मानस आहे.
सॅटेलाईट करणार तुमच्या जमिनीची राखण
- सातबारा उतारा साटेलाईटद्वारे काढलेल्या नकाशाला जोडणार
- जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर
- रोव्हर मशीन वापरून जमिनीचे अक्षांश, रेखांश मिळतील
- हे अक्षांश व रेखांश सातबारा उताऱ्याशी जोडले जातील.
- सातबारा हा उता-यानुसार आहे की नाही याची पडताळणी होणार
- एका शेतकऱ्याच्या हद्दीवरून इतर जमिनींची मोजणी करणे, हद्द ठरवणे शक्य होईल
- जीआयएस रेफरन्सिंग मॅपमुळे जमिनीचे नकाशे पाहणे शक्य
- सरकारी, खासगी जमिनींवरील अतिक्रमणं टाळता येतील
जमीन सातबारा उताऱ्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर कमी आहे, पण सातबारा उताऱ्यानुसार जमीन महसूल गोळा केला जातोय, शेताचा बांध कोरलाय अशा तक्रारी सातबारासंबंधी नेहमी येतात. जमीन खरेदीच्या व्यवहारांतही पैशांचा पूर्ण मोबदला अर्थात पूर्ण जमीन ताब्यात आली का याची पडताळणी आवश्यक असते. यावर भूमी अभिलेख आणि जमाबंदी आयुक्तालयानं अनोखा उपक्रम राबवायला सुरुवात केलीय.